चिखली (विशेष प्रतिनिधी) – धाड ते म्हसला रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून, या रस्त्यावर अपघातांची मालिका सातत्याने सुरूच आहे. काल रात्री (दि.३०) दहा वाजेच्या सुमारास धाडजवळील म्हसला ते जांब मार्गावरील वळणावर अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात कोसळली. या दरम्यान ती लोखंडी कठड्यालाही धडकली. या भीषण अपघातात सासरी परतणार्या विवाहितेचा दीरासह दुर्देवी मृत्यू झाला असून, पती व दोन मुले गंभीर जखमी झालेले आहेत. सुनसान रस्त्यावर त्यांना वेळीच मदतदेखील मिळाली नव्हती.
धाडजवळील म्हसला ते जांब मार्गावर एका वळणाच्या ठिकाणी अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरली. यादरम्यान ती लोखंडी कठड्यालादेखील धडकली. काल, ३० ऑक्टोबरच्या रात्री १० वाजेदरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात सुनीता संतोष पन्हाळे (वय ३६) यांचा मृत्यू झाला. तर कारचालक तिचे दीर आकाश प्रकाश पन्हाळे (वय अंदाजे २४ वर्षे) हादेखील मृत्युमुखी पडला आहे. कारमध्ये मृतक सुनीताचे पती संतोष पन्हाळे आणि दोन मुलेसुद्धा होते. ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी कळविले आहे की, ज्या ठिकाणी अपघात झाला ते ठिकाण अपघातप्रवण स्थळ आहे. जांबजवळ असलेले हे वळण धोकादायक असून, आतापर्यंत याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत. या वळणाची तीव्रता कमी करावी, अशी मागणी वारंवार होत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे वळण मृत्यूचा सापळा ठरत आहे.
—————–