फराळ, वस्त्र, दक्षिणा मिळताच गोरगरिबांच्या चेहर्यावर फुलले हसू!
– गोरगरिबांची दिवाळी केली गोड, जीवंत लक्ष्मी-नारायणाच्या सेवेतून आदर्श प्रस्तूत!
चिखली (एकनाथ माळेकर) – वर्धा येथे जिल्हा उपनिबंधक असलेल्या कैलास शंकरराव गाढे यांनी सालाबादाप्रमाणे याहीवर्षी आपली दिवाळी गोरगरिब, निराश्रितांच्या जीवनात आनंद देऊन साजरी केली. कैलास व बेबीताई या गाढे दाम्पत्याने शेळगाव आटोळ या आपल्या मूळगावी दिवाळीनिमित्त गोरगरिबांना फराळ, कपडे, लुगडे-धोतर, दक्षिणा देऊन अनोखे ‘लक्ष्मीपूजन’ केले. लक्ष्मीपूजनाच्या काळोख्या रात्री गाढे दाम्पत्य साक्षात लक्ष्मी-नारायणच्या रुपात या गोरगरिबांच्या दारी गेले व त्यांना या भेटवस्तू देत त्यांच्या जीवनात दिवाळी सणाचा आनंद निर्माण केला. गाढे दाम्पत्य दरवर्षी हा उपक्रम राबवित असून, यावर्षी या सेवेचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. प्रसिद्धीपासून दूर राहात, ते ही सेवा निष्काम भावनेने करत आहेत.
कैलास गाढे व विष्णू गाढे हे दोघेही बंधू शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. परंतु, समाजाप्रती आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून ते अतिशय नम्रपणे गोरगरिबांना दान देण्याचे महत्पुण्य करत असतात. वर्धा येथे जिल्हा उपनिबंधक असलेले कैलास गाढे व त्यांच्या पत्नी सौ. बेबीताई गाढे या वर्षभर कोणत्या ना कोणत्या कारणाने गोरगरिबांच्या पदरात दान टाकत असतात. थंडीच्या दिवसात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर-अनाथांच्या अंगावर ते उबदार ब्लँकेट टाकतात, मध्यवर्ती कारागृह, वझ्झर येथील अनाथांचे नाथ शंकरबाबांच्या आश्रमात अनाथ बालकांना कपडे, फराळ, भेटवस्तू देऊन भाऊबीज साजरी करतात. गेली २५ वर्षे हा त्यांचा सेवेचा उपक्रम सुरु आहे.
सालाबादाप्रमाणे याहीवर्षी त्यांनी शेळगाव आटोळ या आपल्या मूळगावी दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गोरगरिब ग्रामस्थ, वयोवृद्धांना धोतर, लुगडे, रुमाल-टोपी, फराळ, गोडधोड, दिवे-पणत्या, दक्षिणा घरोघरी जावून वाटप केली. कोणताही गाजावाजा न करता हे दाम्पत्य लक्ष्मीपूजनाच्या काळोख्या रात्री सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत घरोघरी जावून ही दिवाळीभेट वाटप करत होते. याबाबत, लोकं घरोघरी लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करतात, तर आम्ही खर्या व जीवंत लक्ष्मी-नारायणाची पूजा करत आहोत, असे नम्र भाव त्यांनी व्यक्त केले. यावेळी कैलास व बेबीताई गाढे या दाम्पत्याच्या रूपाने साक्षात लक्ष्मी-नारायणचा जोडा आमच्या घरी प्रसाद घेऊन आला, अशा भावना या गोरगरिबांनी व्यक्त केल्यात. त्यांच्या या कार्याचे पंचक्रोषीत कौतुक तर होतच आहे. परंतु, इतरांनीदेखील त्यांचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
—————–