शिंदे-फडणवीस सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ लबाडा घरचे आवतण ठरले; लोणार तालुक्यातील २५ हजार लाभार्थ्यांना मिळालाच नाही!
– शिंदे-फडणवीस सरकारचा नुसताच गाजावाजा, लोणारमध्ये पोहोचल्या केवळ आठ हजार कीट!
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करत, गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचे सांगितले होते. त्यासाठी प्रत्येकी एक किलोचे पाच अन्नधान्य फक्त १०० रुपयांत देण्याचे जाहीर केले होते. परंतु, गोरगरीब बहुजन समाजाला सरकारचा हा शिधा मिळालाच नाही. लोणार तालुक्यासाठी ३१ हजार कीट लागत असताना फक्त ८ हजार कीट मिळाल्यात. त्यामुळे तब्बल २५ हजार लाभार्थ्यांना सरकारचा हा शिधा मिळू शकला नाही, परिणामी त्यांची दिवाळी गोडधोडविनाच साजरी झाली. आता या कीट काळ्या बाजारात तर गेल्या नाहीत ना, असा सवाल निर्माण झाला आहे.
लोणार तालुक्यातील खेड्यापाड्यात तसेच शहरातसुद्धा राज्य सरकारचा आनंद शिधा तर सोडाच, पण नियमित मिळणारे रेशनसुद्धा सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगत, पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आलेले नाही. यावर्षी सर्वांची दिवाळी ही परतीच्या पावसामुळे संकटाच्या ओझ्याखाली दबलेल्या मानसिकतेत गेली आहे. शेतकर्यांची सोयाबीन, कपास व इतर पिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्यांना व शेतमजुरांना शिंदे-फडणवीस सरकारच्या रेशन व आनंदाच्या शिधामुळे दिवाळी गोड होण्यास मदत झाली असती. परंतु ती न होता तालुक्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोडधोडविनाच साजरी झाली. तसेच, आनंदाचा शिधा हा प्रकार गोरगरीब बहुजनांसाठी लबाडा घरचे आवतणच ठरले. दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक स्थिती खालवली आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने अवघ्या शंभर रुपयांत एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो डाळ, एक किलो पाम तेल देण्याचे जाहीर केले होते. परंतु लोणार तालुक्यातील रेशन धारकांना हा आनंदाचा शिधा तर सोडाच परंतु नियमित रेशनसुद्धा मिळाले नाही. हा बहुचर्चित आनंदाचा शिधा उशिरा का होईना काही दुकानदारांना मिळाला तोही अर्धवटच. त्या अर्धवट मिळालेल्या मालाने व बंद असलेल्या मशीनच्या सर्व्हरने दुकानदारांची आणि लाभार्थ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने भरपूर गाजावाजा करून दिवाळीपूर्वी घोषित केलेल्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा या दिवाळी कीट पूर्णपणे सरकारी धान्य गोदामापर्यंतच पोहोचल्याच नाहीत, त्यामुळे रेशन दुकानातून सदर कीटचे वाटप करण्यात आलेले नाही. लोणार तालुक्यात ३१ हजार कीटची आवश्यकता असताना केवळ ८ हजार कीट धान्य गोदामापर्यंत पोहोचू शकल्या, त्यातदेखील हरभरा डाळ नव्हती. त्यामुळे या कीटदेखील अर्धवटच मिळाल्यात. त्यामुळे त्यांचे वाटप होऊ शकले नाही. महाराष्ट्र शासनाने गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो पाम तेल व एक किलो हरभरा डाळ अशा स्वरूपाची आनंदाचा शिधा, म्हणून किट वाटप करण्याचे उद्दिष्ट दिवाळीपूर्वी घेतले होते. परंतु नियोजनाच्या अभावामुळे सदर किट दिवाळीपूर्वी गोदामापर्यंतच पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोडधोडविनाच साजरी झाली आहे.
एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असताना, या शिंदे-फडणवीस सरकारची कोणतीच मदत शेतकर्यापर्यंत पोहोचली नाही. असे असताना दिवाळीपूर्वी घोषित केलेली सिधा देण्याची ही योजना शेतकर्यापर्यंत पोहोचली असती तर थोड्याफार प्रमाणात का होईना त्यांना दिलासा मिळाला असता. परंतु संबंधित यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचा फटका गोरगरीब जनतेला बसला आहे. त्यातून शिंदे-फडणवीस सरकारबद्दल जनतेच्या मनात तीव्र संताप निर्माण झालेला आहे.