गुवाहाटीतील ‘खोक्यां’वरून काँग्रेस-बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले!
– रवी राणा यांचे आरोप गंभीर, त्याची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करा – काँग्रेस
‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, रवी राणांचा सर्वात खोचक निशाणा
मुंबई (प्राची कुलकर्णी) – गुवाहाटीला गेलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांनी पैसे घेतल्याच्या आमदार रवी राणा यांच्या आरोपांनी संतापलेले माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-भाजप सरकारलाच आव्हान दिले आहे. आ. राणा यांच्या आरोपांबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. राणांच्या आरोपांनी दुखावलेले अनेक आमदारही संपर्कात असल्याचा दावा करून त्यांनी शिंदे-फडणवीस यांची झोड उडविली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून, कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते?, याची ईडी, सीबीआयमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. गुवाहाटीतील खोक्यावरून बच्चू कडू व काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रवी राणा यांनी ट्विट करत बच्चू कडूंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, अशी खोचक टीका रवी राणा यांनी केली त्यांच्या या टीकेमुळे बच्चू कडू पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मीडियाशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये घेऊन गुवाहाटीला गेले होते, अशी चर्चा राज्यभरात सुरू होती. त्यावर रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे. रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांच्या एका पत्रावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडून चौकशा झाल्या, त्याच पद्धतीने आता सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले-घेतले गेले याचीही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्यामार्फेत चौकशी झाली पाहिजे. त्यातून राज्यातील सत्तांतराचे सत्य बाहेर येईल व अनेकांचे बुरखे फाटतील. या संस्थांनी जर या प्रकरणाची चौकशी केली नाही तर त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्या निष्पक्ष नसून, सत्ताधार्यांच्या इशार्यावर फक्त विरोधकांना टार्गेट करत आहेत हे स्पष्ट होईल, असे लोंढे म्हणाले. त्यामुळे काँग्रेसच्या मागणीवरून खरेच चौकशी सुरु होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे, गुवाहाटीला गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारांवर पन्नास खोके, एकदम ओके, असा आरोप राज्यात होत आहे. त्याचाच हवाला देत, आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर पैशाच्या देवाणघेवाणीचा आरोप केला होता. तर किराणा वाटप करून निवडणूक लढविणारे महाठग असा आरोप आ. राणा यांचे नाव न घेता केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आ. राणा यांनी गुवाहाटीचा मुद्दा काढत, बच्चू कडू यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केल्याने राणांविरोधात कडू यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच, नागपूर येथे पत्रकार परिषद घेत, आ. कडू यांनी याप्रश्नी शिंदे व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा, वेगळी भूमिका घ्यावी लागेल. राणा यांच्या वक्तव्याने दुखावलेले अनेक आमदार संपर्कात आहेत, असा दावा कडू यांनी केलेला आहे. आ. रवी राणा यांनी जे आरोप केलेत त्याची सत्यता सांगा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देण्यात येणार असून, त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आम्ही सर्व आमदार १ नोव्हेंबरला आमची भूमिका स्पष्ट करू, असा इशाराही आ. कडू यांनी दिलेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच गोची झालेली आहे.
शिंदे गटाकडून बच्चू कडूंना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न!
आमदार रवी राणांवर कारवाई नाही केली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नोटीस देणार आणि सात ते आठ आमदार आमची भूमिका जाहीर करू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. या इशार्यानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंना मंत्रिपदाचे आमिष दाखवून मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत, लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, असे सांगत केसरकर यांनी बच्चू कडूंना संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे. बच्चू कडू यांनी आपल्यासोबत ७ ते ८ आमदार सरकारबाहेर पडण्याचा अप्रत्यक्ष इशाराच सरकारला दिला आहे. यावर केसरकर म्हणाले, बच्चू कडू यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील. त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. किराणा वाटपावरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकर्यांसाठी आंदोलन केले नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. इतकेच नाही तर, गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही राणांनी केला होता. दरम्यान, रवी राणा यांनी ट्विटवर आपली भूमिका मांडली आहे. “दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे”, अशा खोचक शब्दांमध्ये रवी राणा यांनी टीका केली आहे.