लोणार (विनोद पाटील तेजनकर) – पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले असून, त्यांचे बँक हप्तेदेखील बँंक खात्यात जमा झाले आहेत. परंतु, फक्त अल्पसंख्यांक समाजाच्या लाभार्थ्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले असून, अल्पसंख्यांक समाजाच्या लाभार्थ्यांनाच घरकुल कसे मिळाले नाही, असा सवाल करत, या समाजातील लाभार्थ्यांनादेखील पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणार अल्पसंख्याक विभागाच्यावतीने पंचायत समितीला देण्यात आलेले आहे.
लोणार ग्रामीण व शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (घरकुल)चे प्रपत्र डच्या यादीनुसार पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. त्यामधील अल्पसंख्यांक घटकातील पात्र लाभार्थ्यांचे घरकुलचे उद्दिष्ट पूर्णपणे देण्यात आलेले नाही. परंतु, इतरांच्या घरकुलाच्या बांधकामाकरिता पहिला हप्ता त्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तसेच, त्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरु झाले आहे. फक्त अल्पसंख्यांक समाजाचे घरकुल योजनेचे लाभाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही, असे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी हे जाणुनबुजून अल्पसंख्यांक समाजाला घरकुल देत नाही का? असाही सवाल निर्माण होत असून, हा भेदभाव गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष दिल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलचा लाभ अल्पसंख्याक समाजाला नियमानुसार मिळू शकतो. तरी संबंधितांनी अल्पसंख्यांक समाजालादेखील घरकुल द्यावे व अन्याय, भेदभाव दूर करावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने राष्ट्रावादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे पंचायत समिती लोणारला देण्यात आलेला आहे. यावेळी मो लुकमान कुरेशी, जिल्हा कार्या अध्यक्ष राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग. मो तौसिफ़ खान लतिफ खान् लोणार तालूका अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन गटविकास अधिकारी यांच्यामार्फत वरिष्ठांना पाठवण्यात आलेले आहे.
—————-