मरून जीवंत झाल्याचा बनाव रचला, अकोला जिल्ह्यातील भामट्या तरुणासह मांत्रिक पोलिसांच्या ताब्यात
अकोला (जिल्हा प्रतिनिधी) – मृत्यू झाल्याचा बनाव करत नंतर तिरडीवर उठून बसलेल्या २५ वर्षीय तरुणाने मरणाचे ढोंग करून अनेकांना मूर्ख बनविण्याचा उद्योग केला. तसेच, भोंदूगिरीला प्रोत्साहन दिल्याने, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु, सोशल मीडियावर मेलेला तरुण जीवंत झाला व तिरडीवर उठून बसला, बोलू लागला, अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाल्याने अंधश्रद्धेला खतपाणी घातले गेले होते. या तरुणावर व त्याला प्रोत्साहन देणार्या मांत्रिकासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पुढे आली आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावातील प्रशांत मेसरे या २५ वर्षीय तरूणाचा कथितरित्या संध्याकाळी मृत्यू झाला होता. मात्र, अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेत असतानाच तो चक्क उठून बसला व लोकांशी बोलू लागला. त्यामुळे गावात गोंधळ उडाला. तो फक्त उठूनच बसला नाही, तर गप्पाही मारू लागला. त्यानंतर त्याला गावातल्या एका मंदिरात ठेवण्यात आले होते. परंतु, या बोगस व बनावट घटनेच्या माध्यमातून मृत युवकाला जीवंत करुन गावकर्यांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून, त्या युवकासह एका मांत्रिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून, त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकर्यांनी दिली आहे. पोलिस स्टेशनमध्येच प्रशांत मेसरे याची आरोग्य तपासणी केली असता, हा युवक निरोगी आढळून आला. आता हा प्रकार युवकाच्या कुटुंबीयांनी का केला? याचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. पोलिसांनी या युवकाचा, मांत्रिकाचा व युवकाच्या आई-वडिलांचा भंडफोड केला नसता तर मात्र अंधश्रद्धेला ऊत आला असता. त्यामुळे पातूर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बुधवारी सायंकाळी गावामध्ये प्रशांत मृत झाल्याची माहिती पसरली. गावातील सर्व नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. तेथे नातेवाईक अंतिम संस्काराची तयारी करत होते. प्रशांतला तिरडीवर ठेवण्यात आले. अंत्ययात्रा पाचशे मीटर अंतरावर गेली असता प्रशांतच्या आईने मुलाला गावातील मांत्रिक दीपक गणेश बोरले यांच्याकडे घेऊन नेण्याचे सांगितले. तेव्हा अंत्ययात्रा अंतिम संस्कारासाठी न नेता महाराजांकडे वळवली. महाराजांच्या मंत्र उपचारानंतर काही कालावधीतच तिरडीवरील मयत प्रशांत मेसरे उठून बसला. यावेळी अंतिम संस्काराला आलेले नातेवाईक आणि गावकरी चकीत झाले. परंतु, हा सर्व प्रकार बनाव असल्याचे उघडकीस आले असून, आता पोलिसांनी या सर्व भामट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
———————–