– सरकारी डॉक्टरांनो, ते तुकाराम मुंढे आहेत, त्यांची वॉर्निंग सीरिअसली घ्या; नाही तर सरळ घरी जाल!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणासह जिल्ह्यातील सरकारी डॉक्टरांना धोक्याची घंटा वाजली आहे. अनेकांनी सरकारी पगार घेतला आणि टोलेजंग स्वतःचे खासगी दवाखाने बांधले. त्या डॉक्टरांची आता खैर नाही. आता प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर थेट डिसमिस करणार, असे म्हणत डॅशिंग आयएएस अधिकारी तथा आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना व सरकारी डॉक्टरांना लास्ट वॉर्निंग दिली आहे. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार्यांसाठी ही लास्ट वार्निंग आहे असे म्हणत, मुंढे यांनी आरोग्य अधिकार्यांना कडक शब्दात इशारा दिलेला आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’देखील आवर्जुन सांगत आहे, की सरकारी डॉक्टरांनी कायम लक्षात ठेवावे, ते तुकाराम मुंढे आहेत. त्यांची वॉर्निंग या डॉक्टरांनी सीरिअसली घ्यावी, अन्यथा सरळ घरी तर जाल, पण फुकट घेतलेल्या पैशाची वसुलीदेखील होऊ शकते, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.
तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त आरोग्य सेवा पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौर्याला सुरूवात केली आहे. आज ते बीडमध्ये आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. मुंढे यांनी येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. यावेळी तेथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते, यांना सुधारणा करण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मराठवाडा दौर्याला सुरूवात केली. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यातच नवीन पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीत मुंढे मराठवाडा दौरा करत असल्याने आरोग्य कर्मचार्यांची झोप उडाली आहे. बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील अनेक सरकारी डॉक्टर्स खासगी प्रॅक्टिस करत असून, त्यापैकी अनेकांचे खासगी रुग्णालये आहेत. तेथे त्यांच्या पत्नी प्रॅक्टिस करत असल्या तरी हे बहाद्दरदेखील सरकारी दवाखान्यात न जाता, त्यांच्या दवाखान्यात रुग्ण तपासत बसलेले असतात. सर्वसामान्य नागरिकांनीदेखील अशा डॉक्टरांची माहिती सरळ तुकाराम मुंढे यांना द्यावी. किंवा, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला कळवले तरी आम्ही वृत्ताद्वारे ती माहिती मुंढे यांच्यापर्यंत पोहोचवू.
—————