– कर्मचार्यांनी नियम पायदळी तुडविले, ‘अपडाऊन’चा खेड्यापाड्यातील रुग्णांना फटका!
– कुटुंब नियोजन, गर्भवती मातांच्या तपासणीबाबतची सुविधांची वाणवा!
चिखली (एकनाथ माळेकर) – परिसरातील तब्बल १६ गावांसाठी वैद्यकीय उपचारासाठी हक्काचा प्राथमिक दवाखाना असलेले व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्यात सर्वदूर परिचित असलेल्या अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनाचे निष्क्रिय अधिकार्यांमुळे तीन-तेरा वाजले आहेत. जिल्हा परिषद व राज्याच्या आरोग्य विभागाने येथे सर्व सुविधा दिल्या आहेत. परंतु, या निष्क्रिय अधिकार्यांनी त्या सोयीसुविधांचा सत्यानाश करून ठेवला. आरोग्य केंद्राचे प्रमुख आणि इतर कर्मचारी अप-डाऊन करतात. वास्तविक पाहाता, मुख्यालयी राहणे सक्तीचे असताना शासन आदेश पायदळी तुडवून त्यांचे अप-डाऊन सुरुच आहे. आरोग्य केंद्राच्या संचलनासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचा निधी येतो, हा पैसा कुठे खर्च झाल्याचे तर दिसत नाही. मग तो जातो कुठे, याचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी तातडीने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील निष्क्रिय व गलथान कारभारात सुधारणा करावी, अन्यथा थेट ग्रामविकास व आरोग्य मंत्र्यांकडे येथील गलथान कारभाराचा भंडफोड करण्याचा निर्धार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नानााविविध समस्यांचे माहेरघर बनले असून, त्याकडे संबंधित आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अंत्री खेडेकर हे गाव राजकारणातील जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. परंतु काही दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रचंड समस्या निर्माण झाल्या असून, ग्रामस्थांना विविध अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावे येतात. येथे दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, दोन आरोग्य सहाय्यिका, एक आरोग्य सेवक, तीन बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असा बराच मोठा कर्मचारी वर्ग आहे. परंतु बहुतांश कर्मचारी बाहेरगावाहून जाणेयेणे करतात. त्यामुळे सकाळी आरोग्य केंद्र उघडण्यास उशीर होतो. ग्रामीण भागामध्ये सध्या सोयाबीनचा काढणीचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे शरीराला दुखापत होणे, इतर आजारावरील उपचारांसाठी ग्रामस्थ व रोगी या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. परंतु आरोग्य केंद्रात कुणीही कर्मचारी हजर नसतो. त्यामुळे शेतात काम करणार्या व्यक्तीला बाहेरगावी खासगी दवाखान्यांत इलाज करून घ्यावे लागतात. परिणामी, त्यांना शासकीय आरोग्य सेवेचा लाभ न मिळता त्यांची आर्थिक लूट होत आहे.
या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बावस्कर हे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून चार किलोमीटर अंतरावर मेरा खुर्द येथे राहतात. तिथून ते अपडाऊन करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. परंतु त्या इमारतीमध्ये तीन सिस्टर आणि एक शिपाई इतकेच कर्मचारी राहतात. बाकी कर्मचारी बाहेरगावावरून अपडाऊन करतात. या केंद्रात कुणीही कर्मचारी हजर दिसत नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे वेळापत्रक किंवा बोर्ड लावलेला नाही. त्यामुळे बाहेरगाहून आलेल्या व तसेच अंत्री खेडेकर येथील रुग्णांना आरोग्य केंद्राबाहेर ताटकाळत बसावे लागले. डॉक्टर व इतर कर्मचारी सकाळी साडेनऊ ते दहाच्यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येतात. त्यावेळेस ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामस्थ शेतामध्ये गेलेले असतात, व पाच वाजेनंतर जर दवाखान्यात गेले असता कर्मचारी रुग्णांना उद्धट वागणूक देतात. तुम्हाला टाईम समजत नाही का, दवाखाना हा सुरू असताना टाईमातच यावे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र हे चोवीस तास चालू असावे लागते. येथील कर्मचार्यांना अत्यावश्यक सेवेमध्ये २४ तास सेवा देणे बंधनकारक आहे.
हे प्राथमिक आरोग्य केंद्र सकाळी लवकर उघडत नसल्यामुळे गोरगरीब जनतेला खासगी दवाखान्यांमध्ये जाऊन इलाज करावे लागतात. त्यामुळे सर्वसाधारण लोकांवर आर्थिक भूर्दंड पडत आहे. या आरोग्य केंद्रामध्ये बाहेरगावांतील सुद्धा रुग्ण येतात. परंतु त्यांना साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही.या आरोग्य केंद्रात लाखो रुपये खर्च करून वॉटर फिल्टर लावलेले आहे. परंतु त्याचा वापर बाह्य रुग्णासाठी केला जात नाही. या केंद्रामध्ये इमारतीवर पाण्याची टाकी बसवलेली आहे, परंतु दोन वर्षांपासून ती अर्धवट तुटलेली आहे. ती दुरुस्त करण्यासाठीसुद्धा कुणीही प्रयत्न केले नाही. तसेच लाइटिंगचा बोर्ड खाली पडलेला आहे, तोसुद्धा सरळ केलेला नाही. शासनाने चार ते पाच लाख रुपये खर्च करून सोलरची व्यवस्था या दवाखान्यावर करून ठेवलेली आहे. परंतु चार वर्षांपासून तेदेखील धूळ खात पडलेले आहे. या केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वीच २२ हजार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा विक्रम तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सांगळे यांनी केला होता. परंतु शस्त्रक्रिया चालू असताना महावितरण कंपनीची लाईट गेली होती, त्यावेळेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही प्रकारची लाईटची व्यवस्था न्ाव्हती. हा प्रकार रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा आहे. या आरोग्य केंद्रामधील इन्व्हर्टर कित्येक दिवसापासून धूळ खात पडलेले आहे. काही दिवसापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे. परंतु दवाखान्यासमोरील कॅमेरा कंपनीवाल्यांनी काढून नेला तर परत अजूनसुद्धा लावलेला नाही. कंपनीवाल्यांसोबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता उडवाउडवीचा उत्तरे देण्यात आली. या सिस्टममध्ये वरिष्ठ अधिकार्याचे हात तर ओले नाहीत ना, असा सवाल जनतेला पडत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होतात. त्यामध्ये बाहेरगावावरून महिला आरोग्य केंद्रामध्ये येतात. परंतु त्यांना स्वच्छता गृह, बाथरूमची व्यवस्था केलेली दिसत नाही. या ठिकाणी गरोदर मातांची तपासणीसुद्धा केली जाते. या आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या १६ गावांतून गरोदर महिलांना या ठिकाणी आणल्या जाते. परंतु त्यांना गाडीमध्ये इतके कोंबून आणल्या जाते की, त्यांना हलायलासुद्धा जागा नसते. या केंद्रात बाहेरगावावरून डॉक्टर येतात व कॅम्प घेतात. परंतु काही वेळेस बाहेर गावचे डॉक्टर उशिरा येतात, त्यावेळेस गरोदर महिलांना कॅम्पमध्ये ताटकळत बसावे लागते. या केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया होत असल्यामुळे रुग्णांना सात दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येच राहवे लागते. रात्रीचा लाईट गेली तर आरोग्य केंद्रामध्ये मोबाईलच्या लाईटवर रुग्णांना रात्र काढावी लागते. या केंद्राच्या उजव्या बाजूला शासनाने लाखो रुपये खर्च करून गार्डन बनवून दिला होता. परंतु त्या ठिकाणी आजरोजी पूर्णतः गांजर गवत उगवलेले आहे. त्या गांजर गवतामध्ये विंचू, साप वास्तव्यास असतात. या केंद्राचा सफाई कामगार हा सात वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घाणच घाण दिसून येत आहे.
हे आरोग्य केंद्र हे मेरा ते साखरखेर्डा रोडवर आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राला बोर्ड नसल्यामुळे नवीन माणसाला प्राथमिक आरोग्य कोठे आहे हे विचारण्याचा मनस्ताप होत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजसुद्धा नवीन माणसाला कुठे चिठ्ठी फाडायची, कोणत्या केबिनमध्ये डॉक्टर आहेत व कुठे औषधी मिळते, याचा मेळ लागत नाही. बोर्डाबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बावस्कर यांना विचारले असता, हो करून घेऊ, लावू, असे सांगतात. परंतु, बोर्ड काही लागत नाही. या आरोग्य केंद्रावर शासनाचे दरवर्षी पाच लाख रुपये खर्च करण्यासाठी येतात. परंतु ते जातात कुठे, याची चौकशी होण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गप्पी मासे पाळण्यासाठी हौद बनवलेला आहे. परंतु, या हौदाशेजारी घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहे. त्यामुळे तिथे उभेसुद्धा कुणी राहू शकत नाही. या सर्व समस्येबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी परिसरातील ग्रामस्थ मागणी करत आहे.