राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त जाणार!
– कोल्हे यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता, कार्यकर्ता जाणार नसल्याने पक्ष निश्चिंत!
– सोलापूर महापालिका जिंकण्यासाठी शिंदेगट-भाजपला कामाला लागले
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूर महापालिका जिंकण्यासाठी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षांनी कंबर कसली असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने शिंदे गटाच्या गळाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे लागले असून, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हा प्रवेश निश्चित झाला असून, राष्ट्रवादीने मात्र कोल्हे यांना न थांबविण्याची भूमिका घेतली आहे. कोल्हे यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणताही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता जाणार नसल्याची खात्री राष्ट्रवादीला पटली असल्याने पक्ष तूर्त निश्चिंत आहे.
दिलीप कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत. परंतु, पक्षात त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे ते नाराज होते. नुकतीच कोल्हे यांनी दोन वेळा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली होती. दिवाळीनंतर कोल्हे हे बाळासोहबांची शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून, तशी माहितीदेखील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी दिली आहे. कोल्हे यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्तेदेखील बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार आहेत. त्यांची नावे मात्र पुढे येऊ शकली नाहीत. कोल्हे यांनी आजदेखील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतला व चर्चा केली. तसेच, मनीष काळजी, शेजवाल साहेब व इतर नेत्यांशीही त्यांची चर्चा झालेली आहे.
पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे वर्षा बंगल्यावर ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अनेक अडचणीच्या काळात कोल्हे हे ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले आहेत, त्यामुळे माजी महापौर कोल्हे यांच्या राष्ट्रवादी सोडण्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते माजी उममुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे समर्थक मानले जातात. कोल्हे यांच्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदे, तानाजी सावंत यांना सोलापूर महापालिकेच्या रणांगणात स्थानिक नेता मिळणार असल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. तथापि, राष्ट्रवादीने मात्र कोल्हे यांना थांबविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्यांच्यासोबत पक्षातून कोणताही स्थानिक मोठा नेते, किंवा कार्यकर्ता जाणार नसल्याने पक्ष निश्चिंत आहे.
——————-