अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेवून शेतकऱ्याची आत्महत्या
चिखली(तालुका प्रतिनिधी): परतीच्या पावसाने हजारो हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने काही दिवाळी कशी साजरी करावी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा व कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी आपली जीवन यात्रा संपवित आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दरम्यान चिखली तालुक्यातील एकलारा येथील शेतकऱ्याचा अतिवृष्टीने बळी घेतला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने कर्जबजारीपणामुळे शेतकऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली ही घटना 22 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील एकलारा येथील शेतकरी ज्ञानदेव यादव अंभोरे यांच्या शेतातील सोयाबीनचे परतीच्या जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले. यंदाही शेतात हवे तेवढे उत्पन्न होईल आणि कर्ज फेडल्या जाईल मात्र. झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी पाणी झाले. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याने कर्जाचा वाढता डोंगर फेडायचा कसा या विवंचनेते होते. याच विवंचनेतून ज्ञानदेव अंभोरे यांनी 22 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. चिखली पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.