– धीर सोडू नका, खचून जाऊ नका, सरकारला मदत देण्यासाठी बाध्य करेन : ठाकरे
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – परतीच्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पुरता उदध्वस्त झाला असून, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने पोकळ घोषणांच्या व्यतिरिक्त या हतबल शेतकर्यांना काहीही मदत दिली नाही. हवालदिल झालेल्या या शेतकर्यांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज थेट शेतबांधावर पोहोचले. यावेळी अतिशय आपुलकीने त्यांनी शेतकर्यांची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. सर्व परिस्थिती पाहून तुमच्या वेदना समजल्या आहेत. राज्यात जे काही सुरु आहे, त्याचा विचार करू नका. पण तुम्ही धीर सोडू नका, खचून जाऊ नका. या सरकारला तुम्हाला मदत देण्यासाठी बाध्य करेन, अशा शब्दांत ठाकरे यांनी शेतकर्यांच्या पाठीवर हात ठेवत शिवसेना तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. यावेळी एका शेतकर्याने उद्धव ठाकरे यांच्या हातात आसूड देत, या शिंदे-फडणवीस सरकारला वठणीवर आणा, असे आर्जव घातले. दरम्यान, परतीचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकरी पूर्णपणे उदध्वस्त झाला असताना, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुणीही शेतकर्याकडे फिरकले नव्हते. परंतु, उद्धव ठाकरे हे थेट शेतबांधावर गेल्याचे पाहून सरकारमधील मंत्री, शिंदे गटाचे नेते व भाजपच्या नेत्यांनी जोरदार आगपाखड सुरु केली होती. त्याला शिवसेना (ठाकरे) नेत्यांनी तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले.
परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर या गावातील नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीची ठाकरे यांनी पाहणी करून, शेतकर्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी शेतकर्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत असल्याचे सुद्धा सांगितले. तर शेतकर्यांची दिवाळी गोड करा, नोटिसा थांबवा, अशी कैफियत शेतकर्यानी उद्धव ठाकरेंसमोर मांडली. दरम्यान, औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौर्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता.
यावेळी एका शेतकर्याने आपल्या पिकाची नुकसान दाखवत, उद्धव ठाकरे यांच्या हातात त्याच्या जवळील आसूड दिला. आणि, साहेब या शिंदे-फडणवीस सरकारला वठणीवर आणा, असे आर्जव केले. त्यावर, ‘हा आसूड तुमच्याच हातात शोभतो. तुम्ही तो वापरत नाही. तो वापरा. मी तुमच्या पाठीशी आहे. या अडचणीच्या काळात एकत्र होता. संकट दूर झाल्यावर शेतकरी दूर होतात. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी एकत्र राहा. हा आसूड घेऊन फिरू नका, तो आता वापरायचा’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांना धीर दिला. यावेळी जमलेल्या शेतकर्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्यात. आम्ही कर्ज काढून शेतात घातले पण तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. वर्षभर केलेले कष्ट, मेहनत पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली. जे मंत्री संत्री पाहणी करण्यासाठी येतात ते म्हणतात पंचनामे करणार मग तुम्हाला पैसे मिळणार. जमलेल्या शेतकर्यातून एका तरुण शेतकर्याने आपली व्यथा मांडली. मी तरुण शेतकरी आहे. मी बँक आणि सावकरांकडून कर्ज काढले, मी त्या नोटिसला घाबरात नाही पण, जे शेतकरी माझ्यासाठी जमीनदार झालेत ते मला त्रास देत आहेत. बँकवाले त्रास देत आहेत. मग माझ्यासारखा शेतकरी कशाला जगेल तो आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असे या तरुण शेतकर्याने डोळ्यात पाणी आणून सांगितले. त्यावर त्याला दिलासा देत, असे टोकाचे पाऊल उचलायचे नाही, मी तुझ्यासोबत आहे. या सरकारला मदत देण्यासाठी बाध्य करेन, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
कृषिमंत्री रस्त्यावरून जातात पण गावात आणि शेतात येत नाहीत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार आमच्या जिल्ह्याचे असून, आम्हाला आधार कुणाचाच नाही. आम्हाला या सरकारने वार्यावर सोडले, असल्याचा संतापही शेतकर्यांनी व्यक्त केला. कृषिमंत्री बाहेर असतात. त्यांना भेटायची परवानगी मिळत नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
यावेळी शेतकर्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता रडायचं नाही आता लढायचं. संकटं येत असतात त्या संकटांना सामोरं जायचं, मी तुमच्यासोबत आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. संकटं आले तेव्हा तुम्ही एकवटा. तुमच्या हातातील आसूड हा केवळ हातात घेऊन फिरून नका, त्याचा योग्य वेळी वापरही करा.’
———–