शेतकर्यांना ‘गूड न्यूज’! राज्यातून मान्सूनचा पाऊस पूर्णपणे परतला!
पुणे (प्राची कुलकर्णी) – राज्यभरातील शेतकर्यांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नाही, अशी गूडन्यूज हवामान खात्याने दिली. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून पूर्णपणे परतल्याने आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही. मात्र ओदिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका या दोन राज्यांना बसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कालपासून उघडीप मिळाली असून, थंडीला सुरुवात झाली होती.
मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातला होता. परतीच्या पावसाने तर खरिपाच्या पिकांची नासाडी करूनच दम तोडला. त्यात शेतकर्यांची सोयाबीन, कपाशी, भुईमूग, मका व डाळपिके यांची नासाडी झाली. त्यामुळे परतीचा हा पाऊस थांबणार कधी, याची प्रतीक्षा शेतकर्यांना लागली होती. आता कालपासून मान्सून थांबला असून, तो परत गेल्याची बातमी हवामान खात्याने दिल्याने शेतकर्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कालपासून पावसाने विश्रांती घेतली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात (दि.२८) ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने पिके सडून गेली आहेत. या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला असून, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलेले आहे. परंतु, आता महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य मॉन्सून परतला असल्याचे ‘आयएमडी’कडून सांगण्यात आले आहे. आता मॉन्सूनचे पुढील अपडेट एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहेत.