बिबी (प्रतिनिधी) – अज्ञात भामट्याने चिखला काकड येथील शेतकरी महिलेची सोयाबीनची सुडी पेटवून दिल्याने लागलेल्या आगीत या महिलेचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास कुणीतरी असा आगीत घातल्याने या महिलेवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
श्रीमती कमल मुरलीधर इंगळे (वय ५८) राहणार चिखला, तालुका लोणार यांची चिखला शिवारात शेती आहे. काल रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची सुडी कुणी तरी अज्ञात भामट्याने पेटवून दिली व पळ काढला. सुडीवरील ताडपत्रीसह अंदाजे २२ क्विंटल सोयाबीन किंमत ६० हजार रुपये हे जळून खाक झाले. कमल मुरलीधर इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध बिबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार एल. डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखला गावचे बीट जमादार हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे. कमल इंगळे यांनी साडेतीन एकरात सोयाबीन पेरले होते. हे पीकही चांगले होते. या पिकाचा नगदी पैसा दिवाळी सणाला कामी येईल, अशी त्यांची अपेक्षा होता. परंतु, अज्ञात बदमाशाने या आशेवर पाणी फेरले आहे. तलाठी एमबी सरदार यांनी पंचनामा करून लोणार तहसीलला सादर केला आहे.
————–