जालना, औरंगाबादपाठोपाठ चिखली तालुक्यातही जवळपास १८ जणांना भगरीतून विषबाधा!
– अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने प्रकरण दाबले? चिखलीतील विक्रेत्याने अधिकारी मॅनेज केले का?
चिखली (एकनाथ माळेकर) – शेजारच्या औरंगाबाद व जालना जिल्ह्यापाठोपाठ चिखली तालुक्यातही सुमारे १८ ग्रामस्थांना भगरीतून विषबाधा झाली असल्याची माहिती प्राप्त झाली असून, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण दाबल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. चिखली येथील दोन नामांकित ठोक विक्रेत्यांनी (डिलर) ही विषारी भगर विकली होती. तालुक्यातील अनेक किरकोळ दुकानदारांनी ती खेडोपाडी विकली. त्यातून जवळपास १८ जणांना विषबाधा झाली असून, त्यांच्यावर खासगी तसेच सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत. त्या उपचाराचा खर्चही या दोन डिलरने दिला असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे हे प्रकरण दाबले गेले की काय? विषारी भगर नष्ट करण्यात आली असल्याची माहितीही हाती आली आहे. नियमानुसार, या भगरीचे नमुने घेणे, भगरविक्रेत्यांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने हे प्रकरण कसे काय गुंडाळले? हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याच्या अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करून, संबंधित अधिकार्यांवर कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली असून, चिखलीतील त्या दोन डिलरवरही गुन्हे दाखल होण्याची गरज आहे.
वरिष्ठस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चिखली शहरातील दोन नामवंत डिलरने या विषारी भगरचा पुरवठा खेड्यापाड्यातील दुकानदारांना केला होता. सध्या नवरात्री सुरु असल्याने अनेकांना उपवास असतो. यासाठी भगर किंवा भगरीचे पीठ खाल्ले जाते. त्यातून मिसाळवाडीसह अनेक खेड्यातील सुमारे १८ पेक्षाजास्त महिला व पुरुष, लहान बालके आदी ग्रामस्थांना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर चिखली येथे खासगी व सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. याची माहिती अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. परंतु, त्यांनी तडजोडीने हे प्रकरण जागीच मिटवले. चिखलीमध्ये व्यापारी संघटनेची मिटिंग घेण्यात आली. तसेच, देऊळगावराजा व सिंदखेडराजा येथेदेखील अशा प्रकारे बैठका घेण्यात आल्यात. त्या बैठकांत भेसळयुक्त व विषारी भगर जमा करून घेण्यात आली, व ती नष्ट करण्यात आली. वास्तविक पाहाता, ही विषारी भगर जप्त करून तिचे नमुने तपासणीसाठी पाठवायला पाहिजे होते. तसेच, चिखलीतील दोन डिलरसह संबंधित किराणा दुकानदारांवरही गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. परंतु, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यामुळे अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या राज्य आयुक्तांनी तातडीने, चिखलीतील संबंधित अधिकार्यांची चौकशी करावी व जे दोषी असतील, ज्यांनी कर्तव्यात कसून करून डिलर लोकांना वाचवले असेल, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
विशेष धक्कादायक बाब अशी, की चिखली तालुक्याशेजारच्या जालना व औरंगाबाद जिल्ह्यातही भगरीतून जवळपास ५०० जणांना विषबाधा झालेली आहे. त्यात अनेकजण सीरिअस आहेत. चिखली येथील डिलरकडे आलेली विषारी भगरदेखील तिकडच्याच ठोक व्यापार्यांनी पुरवठा केली होती, अशी माहिती गोपनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. औरंगाबाद व जालना येथील अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी भेसळयुक्त व विषारी भगर विकणार्यांवर गुन्हे दाखल केले असून, संबंधितांना अटक केली आहे. चिखली येथील डिलरला मात्र कुणी अभय दिले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर, याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. याबाबत चिखली पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी गिरी यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला सांगितले, की अन्न व भेसळ प्रतिबंधक कार्यालयाने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. आम्ही आमच्या बीडच्या कर्मचार्यांच्या माहितीनुसार तपास करत आहोत.
—
‘त्रास म्हणजे खूप चक्कर यायला लागले. एकदम उलट्या व्हायला लागल्या. संडासला पळावं लागलं. येड्यावानी चक्कर आले. असं वाटलं आता मी जगत नाही.
– एका विषबाधा पीडिताची प्रतिक्रिया
१४ जणांना भगरीतून विषबाधा, सर्वांची तब्येत ठीक
चिखली तालुक्यात ग्रामस्थांना भगरीतून विषबाधा झाली असून, आमच्या माहितीनुसार, रामनगरमधील दोन, कोनड येथील पाच, गोदरी येथील चार, किन्होळा, मिसाळवाडी व आमखेड येथील प्रत्येकी एक अशा १४ ग्रामस्थांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयांत वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, कुणीही मृत्यू नाही. ग्रामस्थांनी भगरीचा वापर काळजीपूर्वक करावा, सकाळी शिळेअन्न खाऊ नये. भगरीतून विषबाधा प्रकरणी आम्ही पोलिसांना कळवलेले आहे. आमच्या माहितीप्रमाणे चिखली पोलिस ठाण्यातील श्री गिरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. माननीय कोर्टाच्या परवानगीने तपास सुरु आहे.
– डॉ. राजेंद्र सांगळे, चिखली तालुका आरोग्य अधिकारी
——————-