राष्ट्रवादीने रणनीती बदलली, पक्षांतर्गत समन्वय राखण्यासाठी आता समिती
सोलापूर (हेमंत चौधरी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व सोलापूर महापालिका निवडणुका जिंकण्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी स्वतः लक्ष घातले आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजी दूर करणे, आणि आगामी निवडणुका व पक्ष बांधणीवर जोर देण्यासाठी आज मुंबईत सोलापूर शहर व जिल्ह्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत पक्षांतर्गत समन्वय समितीदेखील नेमण्यात आली असून, ही समिती जिल्ह्यातील नेत्यांचे प्रश्न व मतभेद समन्वयाने सोडविणार आहे.
सोलापूर शहर व जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार यांनी या जिल्ह्यातून अनेक नेते घडविले आहेत. परंतु, मध्यंतरी अंतर्गत गटबाजीचा पक्षाला मोठा फटका बसला. अनेक चांगले नेते भाजपच्या गळाला लागले व त्यांनी पक्ष खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला. तसेच, विद्यमान पदाधिकारी यांच्यामध्येदेखील समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे पक्षाची ही मरगळ दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घातले आहे. आज या नेत्यांनी मुंबईत शहर व जिल्ह्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली व त्यांना योग्य तो राजकीय सल्ला दिला. तसेच, पक्षांतर्गत समन्वय राखण्यासाठी पक्षाचे सोलापूर जिल्हा पक्षनिरीक्षक शेखर माने यांच्या देखरेखीखाली समन्वय समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, ज्येष्ठ नेते महेश कोठे, महेश गादेकर, संतोष पवार, तौफिक शेख तसेच ए. एन. बेरिया यांचा समावेश आहे. आगामी निवडणुका व पक्ष बांधणी या संदर्भात ही समिती नेते व पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्यात समन्वय राखण्याचे काम करणार आहे. या बैठकीत अजित पवार यांनी या नेत्यांना राजकीय कानमंत्रही दिले आहे. तसेच, जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा आढावादेखील जाणून घेतला.
—————–