– शिंदे गटाचा पालकमंत्री मिळाल्याने शिंदे गटाला लाभले हत्तीचे बळ!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आपल्या महत्वांकांक्षी ‘मिशन -४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभेची जागा बळकविण्याचे काटेकोर नियोजन भारतीय जनता पक्ष करत असताना, या जिल्ह्यात आपली राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. आता भाजपच्या इराद्यांना वेसन घालणे आणि ठाकरे गटाची शिवसेना संपविणे, असे दुहेरी टार्गेट नवीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना गाठावे लागणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तर लोकनियुक्त पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्याकडे, असे चित्र आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सोडले तर इतर कुणीही बंडखोर पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी शिवसेनेविरोधात किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भाषेत बोलताना दिसत नाही. या उलट खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड हे शिंदे गटात गेल्याने दुसर्या फळीतील नेतृत्वाला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची मोट बांधण्यात बाजी मारली असून, शिवसैनिकांसह जनमतदेखील त्यांच्या बाजूने वळले आहे. त्याचा फटका शिंदे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बसेल, असे राजकीय चित्र आहे. सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी काढलेल्या दौर्याकडे शिवसैनिकांसह जनतेनेही पाठ फिरवल्याचे चित्र त्यामुळेच निर्माण झालेले आहे. हे राजकीय चित्र बदलण्याची जबाबदारी आता नवीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर आली असून, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह लोकांचाही पाठिंबा शिंदे गटाला कसा मिळेल, यासाठी पालकमंत्री पाटील यांना रणनीती आखावी लागणार असून, सत्तेच्या माध्यमातून काही पदाधिकारी, कार्यकर्ते यांना ताकदही द्यावी लागणार आहे.
एकीकडे शिंदे गटाची राजकीय ताकद वाढवतानाच, भाजपच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याच्या मनसुब्याचेही पहावे लागणार आहे. सद्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे प्रतिनिधीत्व करत आहेत. भाजप नेतृत्वाने बुलढाण्यातून ‘कमळ’ फुलविण्याचे सूतोवाच केलेले आहे. याचा अर्थ प्रतापरावांना ‘कमळ’ हातात घ्यावे लागेल, असे चिन्ह आहेत. शिंदे गटाला स्वतःचे राजकीय अस्तित्व जपायचे असेल तर प्रतापरावांना शिवसेनेच्या चिन्हावरच खासदार बनवावे लागेल. त्यासाठी भाजपच्या ‘मिशन-४५’ला बुलढाण्यातच खीळ घालावी लागणार आहे. परंतु, राज्यात भाजपच्या चाणक्यनीतीमुळेच शिंदे गटाला सत्ता मिळू शकली. त्यामुळे भाजप तसे सहजासहजी ऐकणार नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना राजकीय तोडगा काढून लोकसभेची आपली जागा टिकवून ठेवावी लागण्याची राजकीय कसरत करावी लागणार आहे.
जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष मोठा आहे. अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. त्यादृष्टीने विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याची किमयादेखील पालकमंत्री पाटील यांना करावी लागणार आहे. बुलढाणा जिल्हा हा जळगाव जिल्ह्याचा शेजारी आहे. त्यामुळे बुलढाण्याचा ‘राजकीय शेजारधर्म’ गुलाबराव पाटलांना चांगलाच माहिती आहे. जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांसाठी ते आजही ‘गुलाबभाऊ’च आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा शिंदे गट मजबूत करण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. फक्त भाजपच्या राजकीय व्यूहरचनेत शिंदे गटाचे स्वतंत्र अस्तित्व टिकविण्याची मोठी कामगिरी त्यांना फत्ते करावी लागणार आहे, त्यांचा कस नेमके तिथेच लागणार आहे. गुलाबराव पाटील पालकमंत्री झाल्याने शिंदे गटाला हत्तीचे बळ मिळाले असले तरी, हे पालकमंत्रीपद जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेणारे ठरावे, अशी जिल्हावासीयांची अपेक्षा आहे.
—————-