Breaking newsHead linesMaharashtraPolitics

‘मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे’; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या बेताल वक्तव्याने मराठा समाज खवळला!

– राज्यभरातून छी थू झाल्यानंतर मंत्री सावंत यांनी मागितली माफी!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना, शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, अशा प्रकारचे अत्यंत आक्षेपार्ह व बेताल विधान केल्याने संपूर्ण मराठा समाजातून संतापाची लाट उसळलेली आहे. सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. तसेच मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटीलही आक्रमक झाले असून, सावंत यांना तातडीने समज द्या, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, त्यांना मराठा समाजाची माफी मागायला लावा, अशी मागणी केली आहे.

राज्यात सत्तांतर होताच मराठा आरक्षण मागण्याची खाज सुटली का? असे वक्तव्य करणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर मराठा संघटनांकडून टीकास्त्र सोडण्यात येत असून, उस्मानाबाद येथील मेळाव्यात मंत्री सावंत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली का? आता ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत, नंतर एससीमधून मागतील, असे सावंत म्हणाले होते. सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणार्‍या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. २०१४ साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
संभाजी ब्रिगेडनेही सावंत यांचा निषेध केला. ‘मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, ही संभाजी ब्रिगेडची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. कारण ती संविधानिक मागणी आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या सरंजामी आणि प्रस्थापित मराठ्यांमुळे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही’, असे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीदेखील सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण ओबीसीतून असेल तर मराठा तरुण ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मागणार आहेत. तानाजी सावंत यांच्या वागण्याने मराठा समाजाची बदनामी झाली आहे. सरकारमधील वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली. तर तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा, मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड सावंत यांची खाज उतरवल्याशिवाय आणि धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.


तानाजी सावंत यांनी व्यक्त केली दिलगिरी!

राज्यभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?’, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असे तानाजी सावंत यांनी म्हटले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!