मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रताप मोरे) – सोशल मीडियावर कुठले तरी जुने व्हिडिओ शेअर केले जात असून, ग्रामीण भागात मुले पळविणारी टोळी सक्रीय असल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये मोठे घबराटीचे वातावरण पसरले आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुले पळविण्याचा एकही गुन्हा दाखल नाही, सर्व अफवाच आहेत. त्यामुळे, मुले पळवणारी टोळी ही निव्वळ अफवा असून, महिला व पुरुषांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत ५० गावे असून, या गावांमध्ये पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून सर्वत्र चोर आल्याच्या अफवेने खेड्यापाड्यात मोठी भीती निर्माण केली आहे. त्यामुळे, गावांत आलेल्या निर्दोष इसमांना मारहाण केल्या जात आहे आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संभ्रमित करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालावा. कुणी संशयास्पद आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. मुले पळवून नेणार्या टोळीची अफवा असून, दिनांक २१ रोजी साखरखेर्डा येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीच्या एका विद्यार्थ्याने पोलिसांना अपहरण झाल्याची माहिती दिली. दरम्यान, याची चौकशी करून त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, सदर मुलाच्या सांगण्यात काहीही तथ्य आढळून आले नाही. पालकांनी आपली पाल्ये बिनधास्तपणे शाळेत पाठवावीत व खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलीस प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गावात काही प्रकार आढळून आल्यास तात्काळ नागरिकांनी त्याची गोपनीय माहिती पोलिसांना द्यावी, अशी माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रला दिली आहे.
—————