BULDHANAChikhali

पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्‍यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणाला सांडवा तयार करा!

चिखली (तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा येथील येळगावचे धरण यापूर्वीच शंभर टक्के भरलेले आहे. आणि त्यातच दि. १८-१९सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे या धरणाचे स्वयंचलीत गेट अचानक खुलल्याने पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्‍यांचे शेतीपिकाचे यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पैनगंगा नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या शेतीपिकाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ८सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी, नदीकाठच्या शेतकर्‍यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातील पाच गेट काढून सांडवा तयार करण्यात यावा, यासह विविध मागण्या शेतकर्‍यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, भगवानराव मोरे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दि. २१ सप्टेंबर रोजी केल्या आहेत. तर मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

जेव्हापासून येळगाव धरणाचा सांडवा बंद करून त्या सांडव्यामध्ये ८० स्वयंचलीत गेट बसवले आहेत. तेव्हापासून दरवर्षी बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतवर्‍यांच्या सोयाबीन व इतर शेतीपिकाचे मोठे नुकसान होत आहे. मागील वर्षीच्या अशाच महापुराने नदीकाठावरील शेतकर्‍यांचे १०० टक्के नुकसान झाल्याने, यावर्षी धरण ओव्हर फ्लो होऊन स्वयंचलीत गेट एकाचवेळी पाण्याच्या दबावामुळे खुले नये, यासाठी ४ ते ५ गेट खुले ठेवून पाण्याचा विसर्ग नदीमध्ये सुरु ठेवण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा, मुख्याधिकारी बुलढाणा यांच्याकडे शेतकर्‍यांनी केली होती. तर शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शासन जबाबदार राहील, असेसुद्धा अवगत केले होते. तर मध्यंतरी आलेल्या पावसामुळे व नगरपालिकेने यावर लक्ष केंद्रीत केल्याने बर्‍यापैकी शेतीपिकाचे नुकसान टळले होते. परंतु बुलढाणा येथे दि.१७ ते १८ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे येळगाव धरणामधे पाणीसाठा जास्तीचा झाल्याने व स्वयंचलीत गेट एकाचवेळी उघडल्याने धरणातून मोठा विसर्ग पैनगंगा नदीत आल्याने व इतरही नद्यांचे पाणी नदीपात्रात आल्याने पूरस्थिती निर्माण होऊन शेतात पाणी घुसले. परिणामी, चिखली तालुक्यातील नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी झाली आहे. तर सद्या परिस्थितीत पाणी साचले आहे.

याबाबतची माहिती मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्‍यांसह नदीकाठच्या शेताची पाहणी केली, नुकसान दिसून आल्याने दि.२१ सप्टेंबर रोजी सरनाईक यांनी शेतकर्‍यांसह चिखली तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांची भेट घेऊन पुराच्या पावसाने झालेल्या सोयाबीन, उडीद, मुंग व इतर पिकाचे पंचनामे तातडीने करण्यात यावे, ८ सप्टेंबरच्या वाढीव मदतीच्या शासन निर्णयानुसार शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वारंवार येळगाव धरणाच्या पाण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगूनही शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित दोषीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात यावा, यळगाव धरणाच्या सांडवा बंद करुण अनाधिकृत टाकलेले ८० गेटमुळे शेतकर्‍यांचे होणार नुकसान कायमस्वरुपी टाळण्यासाठी धरणाचे ५ ते १० गेट काढून सांडवा तयार करण्यात यावा, येळगाव धरणाच्या गेट संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक लावून समस्या कायमस्वरुपी सोडवण्यात यावी, यासह आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, सखाराम भुतेकर, फिरोज खान, सतिष सुरडकर, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे, संजय हाडे, परसराम भुतेकर, तुकाराम होगे, भगवान देव्हडे, शिवशंकर माने, उमेश सुरडकर, प्रकाश पवार, विष्णु हाडे, दत्तात्रय करवंदे, उत्तम करवंदे, विठ्ठल वसु, नारायण भुसारी यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!