Breaking newsBULDHANAChikhaliHead linesMaharashtraVidharbhaWorld update

नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरले, काढणीच्या वेळीच व्यापार्‍यांनी भाव पाडले!

– अतिवृष्टीत पीक सडले, उरले ते विकावे तर भाव पडले; सोंगणीची मजुरीही परवडेनाशी झाली!

चिखली (एकनाथ माळेकर) – सोयाबीनच्या काढणीवेळीच व्यापार्‍यांनी भाव पाडल्याने शेतकरी हादरून गेले आहेत. कष्टाने शेतीत काळवंडलेल्या शेतकर्‍यांना यावेळी सोयाबीनपासून मोठी अपेक्षा होती. मात्र, आताच दरातील होणारी घसरण शेतकर्‍यांचा जीव खाली-वर करत आहे. भाव मिळणार या आशेवर मोठ्या प्रमाणात खर्च करणारा शेतकरी आता अर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन सोंगणीची मजुरीदेखील गगनाला भिडली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस पडलेला नाही.

ऐन पेरणीच्या वेळी सोयाबीन ८ हजार रुपये प्रतिक्विंटल विकल्या गेले. त्यामुळे शेतकर्‍यांनी इतर पिकांचा पेरा कमी करत सोयाबीनला प्राधान्य दिले. डिझेलचे भाव वाढल्याने शेतीचा मशागत खर्चदेखील वाढला आहे. तालुक्यातील ८९ हजार वहिती क्षेत्रापैकी तब्बल ७१ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा २०२१-२२ मध्ये झाला. गतवर्षी हा पेरा ६८ हजार हेक्टर होता. यंदा कपाशी लागवडदेखील अत्यल्प म्हणजे केवळ ५०० हेक्टर एवढीच आहे. उडीद, मूगदेखील दोन, तीन हजार हेक्टर असून, आता शेतकरी सोयाबीनलाच नगदी पिक समजून पेरणी करत आहेत. त्यामुळे इतर पिकांचे पेरणी क्षेत्र घटत चालले आहे. गतवर्षी ६८ हजार हेक्टर पेरा होता. तेव्हा आणि सोंगणी मजुरी ३ हजार रुपये प्रति एकर होती. त्यानंतर काढणीची मजुरी १५० ते २०० क्विंटल होती. मागील वर्षी सुरुवातीचा काळ वगळला तर सोयाबीनला तब्बल ८ हजार प्रती क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे झडती कमी येऊनदेखील ज्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सुरुवातीला थांबून भाव वाढल्यावर विक्री केली, ते फायद्यात राहिले.

ऐनवेळेवरची फजिती टाळण्यासाठी मजुरांना इसार

आता शेतकर्‍यांची नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ झाल्याने परत ४ ते ५ हजार रुपये क्विंटल असा भाव आहे. खर्च वाढला असताना मजुरीचा तसेच मळणीचा दरदेखील वाढलेला आहे. यावर्षी ३ हजार ५०० रुपये एकर सोंगणीसाठीची मजुरी निघाली. शेतकरी सोंगणीसाठी मजुरांना आतापासून आरक्षित करून ठेवत इसार देत आहेत. सोयाबीन सोंगणीकरिता मनुष्यबळ जोडले जात आहे. गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी काही प्रमाणात सोयाबीनचा पेरा वाढल्याने उत्पादनदेखील तब्बल १० लाख ६५ क्विंटल एवढे अपेक्षित आहे.

मजूर मिळणे झाले कठीण
३ हजार ५०० रुपये एकरपेक्षा जास्त मजुरी देऊनदेखील शेतकर्‍यांना सोयाबीन सोंगणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यातच सर्वच शेतकर्‍यांनी ट्रक्टरच्या साह्याने पेरणी केल्याने सर्वच शेतकर्‍यांचे सोयाबीन एकाचवेळी सोंगणीसाठी येणार आहे. त्यामुळे मजुरांचीदेखील चांगलीच दमछाक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सोयाबीन सोंगणीचे सौदे करून ठेवल्या जात आहेत.

पेरणीवेळी सोयाबीनला ८ हजारांचा भाव

गत तीन महिन्यांपूर्वी सोयाबीनचे भाव ८ हजार रुपये क्विंटल होते. त्यावेळी शेतकरी समाधानी होते. सोयाबीन काढण्याची वेळ आली आणि भाव पडले. त्यामुळे आता मशागत आणि पेरणीसाठी झालेला खर्चदेखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. कधी नव्हे यंदा सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या कीटकनाशकांची फवारणी शेतकर्‍यांना करावी लागली.


शेतकर्‍यांचा निर्धार : सोयाबीन प्रश्नावर छेडणार आंदोलन!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलढाणा येथे जिल्ह्यातील विविध भागातील प्रातिनिधिक शेतकरी, तसेच संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. याबैठकीत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या समस्या, सोयाबीन-कापसाचे पडलेले दर, यासह इतर बाबींवर प्रामुख्याने सविस्तर चर्चा झाली. तर मागील वर्षीच्या धर्तीवर यावर्षीही मोठे आंदोलन करण्याचा निर्धार शेतकरी बांधवांनी बैठकीत केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!