BULDHANACrimeVidharbha

शिवसेनेच्या मेहकर तालुकाप्रमुखांच्या हत्येचे षडयंत्र होते का?; दुचाकीवरील एकाने तलवार दाखवली!

– मेहकरातील राजकारण धोकादायक वळणावर!
– तलवार दाखवून भीती निर्माण केली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ न सोडण्याचा तालुका प्रमुखांचा निर्धार!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शिवसेनेचे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांच्या हत्येचा दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी प्रयत्न केला असावा, असा संशय निर्माण झाला असून, या दोघांनी तलवार घेऊन पांडव यांचा पाठलाग केला. एकाने तर तलवार काढून पांडव यांना दाखवली. परंतु, पांडव यांनी धाडसाने पोलिसांना फोन केल्याने, दुचाकीस्वार पळून गेले. या घटनेने मेहकरातील राजकीय वातावरण धोकादायक वळणावर पोहोचल्याचे दिसून येते आहे. तलवार दाखवून आपल्याला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी, आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचा निर्धार पांडव यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी डोणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस त्या अज्ञात दुचाकीस्वारांचा कसून तपास करत आहेत.

शिवसेना तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काल, २० तारखेला ते पक्षाच्या कामाकरिता मेहकर येथे आले होते. काम संपल्यानंतर ते डोणगावकडे परत निघाले. रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात मोटारसायकल स्वारांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पावणे नऊ वाजेच्या सुमारास या मोटारसायकलस्वारांनी त्यांना नागापूरजवळ ओव्हरटेक केले. त्यामुळे पांडव यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला असता, त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने तलवार काढली व पांडव यांना दाखवली. त्यामुळे पांडव यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला, वर्दळीच्या ठिकाणी गाडी थांबवून घेतली. त्यामुळे कदाचित जीवे मारण्याच्या उद्देशाने आलेले हे दुचाकीस्वार पळून गेले.

कुणी तरी अज्ञात व्यक्तीने तलवार दाखवून आपल्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे पांडव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले असले तरी, अज्ञात व्यक्तींनी पांडव यांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचले असावे, असा संशय निर्माण झाला आहे. पांडव हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना तालुक्यात जोमाने वाढवत असून, त्यांना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांची मजबूत साथ आहे. त्यामुळे राजकीय विरोधातून तर हा प्रकार घडला नाही ना, असा संशय निर्माण झालेला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी पांडव यांना तात्काळ पोलिस संरक्षण देण्याची मागणी ऐरणीवर आली आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!