CrimeHead linesMumbai

एटीएसने जहाल नक्षलवाद्याच्या मुसक्या आवळल्या

मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई उपनगरातील नालासोपार्‍यातून जहाल नक्षलवाद्याला अटक केली आहे. हुलस यादव (४५) असे या नक्षलवाद्याचे नाव असून, तो मूळचा झारखंडचा आहे. त्याच्यावर १५ लाखांचे बक्षीस होते. आरोपीबाबत झारखंड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.

हुलस यादव हा झारखंडच्या डोडगा येथील रहिवासी आहे. तो सन २००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच तो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या केंद्र सरकाने बंदी घातलेल्या संघटनेचा हजारीबाग येथील रिजनल कमिटी सदस्यदेखील आहे. त्याच्यावर सरकारने १५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. हा नक्षलवादी झारखंडमधून मुंबईत उपचारासाठी आला होता. नालासोपारा परिसरात तो लपून राहत होता. या संबंधित माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने आज सकाळी नालासोपाराच्या धानीव बाग आणि रामनगर भागातील चाळींवर छापे टाकले. या छाप्यात त्यांनी हुलस यादव या जहाल नक्षलवाद्याला अटक केली.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, हुलस यादव हा रविवारी पहाटे नालासोपारा येथील रामनगर येथील धानवीतील एका चाळीत औषधोपचाराकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यानुसार पथकाने सापळा रचत याठिकाणी छापा टाकून यादवला ताब्यात घेतले. अधिक तपास सुरु आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या घटनेची ट्वीटरव्दारे माहिती देत, एटीएसचे अभिनंदन केले आहे.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!