मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीपूर्वी होईल, अशी माहिती मुंबईस्थित राजकीय सूत्राने दिली आहे. त्यामुळे भाजपपेक्षा शिंदे गटातील हालचालींना वेग आला आहे. अनेकांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली असून, मंत्रिपद मिळाले नाही तर स्वगृही जाण्याचीही तयारी चालवली आहे. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळावा, असे आता प्रत्येक बंडखोर म्हणून लागला आहे. मंत्रिपद, महामंडळे व समित्यांचे अध्यक्षपद याबाबतचे वाटप लवकरात लवकर करण्यासाठीदेखील दबाव वाढला आहे.
बंडखोर आमदारांपैकी काहीजण मंत्रिपदाच्या आमिषाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. तर काहींना महामंडळे व समित्यांचे अध्यक्षपद देऊ, असे सांगितल्या गेले होते. त्यामुळे संबंधितांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला शब्द पाळा, असा घोषा लावला आहे. दुसरीकडे, भाजपमध्येदेखील अनेकांनी मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी प्रत्येकाला मंत्रिपद हवे आहे. कुणाला मंत्रिपद मिळेल आणि कुणाला नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, शिंदे-फडणवीस यांच्या स्तरावर मात्र प्राथमिक यादी तयार झालेली आहे. लवकरच हायकमांडशी चर्चा करून ही यादी फायनल होईल. आमदार बच्चू कडू, रवी राणा, संजय सिरसाठ यांच्यासह काही चर्चेतील नावे या यादीत असल्याचे सांगण्यात आले. तथापि, ही यादी शेवटच्याक्षणी बदलली जाऊ शकते. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळालेले नाही. परंतु, दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारात चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील, माधुरी मिसाळ यांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास ५० जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याच नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात १९ जणांचा शपथविधी पार पडलेला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांचे जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे.
—————-