– पेठ ग्रामस्थांत प्रशासन व लोकप्रतिनिधीविषयी तीव्र संताप
अंत्री काेळी, ता. चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली ते अमडापूर महामार्गावर असलेल्या पेठ येथे आन्वी फाटा ते बुलढाणा फाटा दरम्यान पथदिवे महामार्गाचे बांधकाम करणार्या कंपनीने उभे करून दिले आहेत. परंतु, या खांबांवर अद्याप दिवेच बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे खांब उभे केले पण उजेड कधी पडणार?, असा संतप्त सवाल ग्रामस्थ व पादचारी करत आहेत.
उभ्या केलेल्या खांबवर लाईट लावण्याची जबाबदारी कुणाची आहे, हा प्रश्न निर्माण झाला असून, त्यामुळे पथदिवे कधी सुरु होणार, असा सवाल निर्माण होत आहे. उंद्री टोलनाकामध्ये येत असलेले पेठ हे गाव मुख्य रस्त्यावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन या मार्गावरील पथदिव्यांवर दिवे लावण्यासाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. तसेच,स्थानिक ग्रामपंचायतीनेदेखील पाठपुरावा करण्याची गरज आहे. फक्त खांब उभे करून गावकर्यांना दिलासा देण्यात आला असून, एक वेळेस ट्रायल झाले होते. परंतु, त्यानंतर या खांबांवर लाईट कधीच लागले नाहीत.
विशेष बाब म्हणजे, या वर्दळीच्या रस्त्यावर आतापर्यंत चार अपघात झाले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे महामार्गा बांधणार्या कंपनीने खांब उभे करून दिले तर दिवे लावणे हीदेखील याच कंपनीची जबाबदारी आहे. परंतु, ही कंपनी आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर, जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागासह स्थानिक ग्रामपंचायतीने दिवे लावून घेणे अत्यावश्यक आहे. परंतु, सर्वच शासकीय यंत्रणा चालढकल करत असल्याने खांबांवर दिवे लावले जात नाही आणि गेल्या दोन वर्षांपासून पेठ हे गाव अंधारात आहे.