BULDHANAChikhaliVidharbha

मेरा बुद्रूकच्या महिला सरपंचांना मारहाण; गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करा!

– सरपंच सौ. अनिताताई वायाळ यांना पोलिस संरक्षणाची मागणी

मेरा बुद्रूक, ता. चिखली (प्रतिनिधी) – गावातील सांडपाण्याचे नियोजन करीत असतांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने सरपंच सौ. अनिताताई वायाळ यांना लोटपाट करुन मारहाण करीत, छेडछाड करीत, विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तिवर कठोर कार्यवाही करावी, तसेच सौ. वायाळ यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने अध्यक्षा सौ. अर्चना बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक गावांमध्ये सरपंच पदावर महिला सरपंच आहेत. मेरा बुद्रूक हे दहा हजार लोकसंख्येचे गाव असून, ११ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये सौ अनीताताई लक्ष्मण वायाळ ह्या लोकशाही मार्गाने निवडणुकीमध्ये विजयी झाल्या. त्या काळामध्ये गावामध्ये भीषण पाणीटंचाई होती. परंतु आपल्या सहकार्‍यांना सोबत घेवून योग्य नियोजन करत, पाणी टंचाईवर मात केली. गावामध्ये विकासाच्या विविध योजना आणल्या. त्या सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या सांडपाण्याचे नियोजन आपल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन करत असताना, तिथे गावातील सुनिल माधवराव पडघान व अनंथा शामराव पडघान हे दोघे जण आले व अश्लिल भाषेत शिवीगाळ केली व महिला सरपंचाला मारहाण करून विनयभंग केला. ह्या घटनेची पोलिस तक्रार केली असता या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. परंतु त्याच दिवशी रात्री एक मनघडण कहाणी रचून सरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

सरपंच हा गावाचा घटनात्मक प्रमुख असतो. त्यात महिलांचा आदर करणे ही आपली संस्कृती आहे. आणि अशा घटना घडणे अत्यंत लज्जास्पद आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हा एका व्यक्तीचा नसून लोकशाहीचा आपमान आहे. त्यामुळे असे विघातक कृत्य करणार्‍यांवर कठोर करवाई व्हावी, तसेच सरपंच महिला, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे खारीज करण्यात यावे. सरपंच हे पद लोकसेवकाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट करण्यात यावे. आणि, महिला सरपंचांना मासिक सभा ग्रामसभा व इतर सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच संघटनेच्या तालुका अध्यक्षा सौ. अर्चना बाळासाहेब पवार, आमडापुर, मंगरूळ नवघरे, तेल्हारा, सोनेवडी, मलगणी, केलवद, पळसखेड, भानखेड, गोद्री, आसोला, शेळगाव अटोळ, रोहडा, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, मलगी, मुरादपुर, कोलारा, भरोसा, मनुबाई, गुंजाळा, पाटोदा यांसह चाळीस गावांतील सरपंचांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!