– गाडी नाचवायचीय? चिखली-साकेगाव रस्त्याने चालवा!
केळवद, ता. चिखली (महेंद्र हिवाळे) – चिखली ते साकेगाव हा रस्ता पूर्णपणे उखडला गेला असून, हा रस्ता ‘डान्सिंग रोड’ बनला आहे. ज्याला आपल्या गाड्या नाचवायच्या आहेत, आणि हाडं खिळखिळी करून घ्यायची आहेत, त्यांनी या रस्त्याने जावे. हा रस्ता पूर्ण उखडला असला तरी, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, खासदार प्रतापराव जाधव किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना याचे काहीही सोयरसुतक दिसत नाही. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा विचार त्रासलेले संतप्त ग्रामस्थ करत आहेत.
नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण असते. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असते. चिखली ते साकेगाव रोड या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. परंतु, या मागणीला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोघेही वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. चिखली तालुका जवळ असल्याकारणाने नर्सरीपासून ते कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी गाडी, बस किंवा रिक्षांनी जाणे-येणे करतात. या शिवाय, शेतकरी, मजूर वर्ग रस्त्याने मोठ्या प्रमाणात जात असल्या कारणाने नेहमी रस्त्याने वर्दळ असते. प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनाने प्रवास करणार्या वाहनचालकांना रस्त्यावर असंख्य खड्डे असल्याने जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण रस्ताच असा बनला आहे की, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळेना झाले आहे.
ग्रामस्थ, विद्यार्थी, वाहनचालक यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे. जडवाहतूक दिवसंरात्र सुरू राहिल्याने या मार्गावर मोठमोठे खड्डे पडून डांबर निघून गिट्टी बाहेर आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो. या मार्गावर नेहमी छोटे मोठे अपघात होत राहतात, म्हणून बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करून मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. तसेच, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थ करत आहेत. रस्ता प्रचंड खराब झाला असून, शेतकरी, ग्रामस्थ विद्यार्थी, वाहनधारक यांना या रस्त्याने जाणे मुश्कील झाले आहे, याची दाखल आमदारांनी तातडीने घ्यावी, अशी मागणी जनमाणसातून पुढे आली आहे.
—————-