Head linesPune

पुण्यात बनावट पनीर बनविणार्‍या कारखान्यांवर छापे सुरुच!

– अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणार्‍या तिसर्‍या कारखान्यावर कारवाई

पुणे (युनूस खतीब) – अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रूक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर छापा टाकण्यात येऊन बनावट पनीर बनवण्याचा पर्दाफास करण्यात आला. या कारवाईत २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणार्‍या तिसर्‍या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे. यापूर्वी वानवडी येथे बनावट पनीर तयार करणार्‍या मे. टीप टॉप डेरीवर छापा टाकत ३ लाख २९ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता, आणि पहिली कारवाई ही हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे. आर. एस डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणार्‍या कारखान्यावर छापा मारत, २९ हजार ४०० रुपयांचा किमती माल जप्त केला होता. भेसळखोरांमुळे पनीर खाणार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे, नकली पनीरचा बाजार फोफावला असून, अत्यंत वाईट पध्दतीने पनीर तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कोंढवा बुद्रूक येथील कारखान्यावर छापा टाकला असता, अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत, किंमत २ लाख ३९ हजार ८०० रूपये किंमतीचे १ हजार १९९ किलो पनीर, १८ लाख ७१ हजार ६५२ रूपये किंमतीचे ४ हजार ७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ५३ हजार ६७५ रूपये किंमतीचे १ हजार ४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करुन कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल प्रâी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!