मार्डीतील यमाईदेवी मंदिरातील चोरीचा अद्याप छडा नाही; भाविकांनी दिली अन्नत्याग आंदोलनाची हाक!
– मंदिरातील चोरीला हजार दिवस पूर्ण, आता शिंदे सरकारनेच लक्ष घालण्याची भाविकांची मागणी
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूरसह आंध्रप्रदेश, कर्नाटकांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्डी (उत्तर सोलापूर) येथील यमाई देवी मंदिरातील देवीचे सौभाग्य लेणे यासह ४० ते ५० किलो चांदी, आठ ते दहा तोळे सोने, दानपेटीतील अडिच ते तीन लाखाची रोख रक्कम चोरीस जावून आता हजार दिवस पूर्ण होत आलेत, तरीही पोलिसांना चोरांचा सुगावा लागला नाही. त्यामुळे देवीचे सौभाग्य लेणे कधी परत येणार व आरोपींना अटक केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण होत असून, देवीभक्तांनी एका दिवसाच्या अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने तातडीने याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी देवीभक्त करत आहेत.
कोरोना काळात वर्षभरापासून मंदिरातील सीसीटीव्ही बंद होते. त्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी संधी साधली व मंदिरात २३ डिसेंबर २०१९ रोजी चोरी झाली. याबाबत देवीच्या भगताने उत्तर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु, आता चार वर्षे होत आली तरी, या चोरीचा तपास पोलिसांना लागला नाही, यावरून पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर आली आहे. मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, सामाजिक कार्यकर्ते विष्णू जगताप यांनी तत्कालिन ठाकरे सरकारला चोरीचा तपास लावण्याबाबत पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत निवेदनही दिले होते. परंतु, सरकारने त्याची दखल घेतली नाही. उत्तर तालुका पोलिस निष्क्रिय ठरल्याने, या चोरीचा तपास सीआयडीकडे द्यावा, अशी देवीभक्तांची मागणी आहे. तसेच, यमाईदेवी मंदीर समितीने केलेल्या गैरकारभाराची चौकशी होण्याचीदेखील गरज आहे. विशेष बाब म्हणजे, भाविक-भक्त मोठ्या श्रद्धेने देवीस दागदागिने, रोख रक्कम अर्पण करत असतात. परंतु, काही मंदिराशी संबंधित भामटे वारंवार देवीच्या दागिण्यांवर डल्ला मारत आहेत. काही जण तर देवीच्या देणगी पेटीवर ताट ठेवून भाविकांचे पैसे लुबाडत आहेत. त्यामुळे हे मंदीर राज्य सरकारने ताब्यात घ्यावे व न्यायाधीशांच्या नेतृत्वातील विश्वस्त मंडळ नेमावे, अशी मागणीदेखील आता पुढे आली आहे.
चोरी करून जाताना चोरट्यांनी देवीच्या चेहर्यावर वस्त्राने झाकले होते. यापूर्वी नवरात्र काळातदेखील मंदिरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर व त्याच खोलीतील बंद कपाटातील एक ते दीड लाख रुपयांची नाणी चोरीला गेली होती. वारंवार दानपेटी फोडून त्यातील रक्कम व मौल्यवान वस्तू गायब होत असतात. त्यामुळे चोरटे हे मंदिराशी संबंधित असावेत, असा संशय निर्माण होतो आहे. याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारही झालेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाच चोरी कशी काय होते, हादेखील मोठा प्रश्न आहे.
——————-