AURANGABADBreaking newsHead linesMarathwadaPAITHAN

मंत्री भुमरेंनी मिळालेल्या ५० खोक्यांतून सभेसाठी पैसे वाटप केले!

– विरोधी पक्षनेते अजित पवारही संतापले, ‘सभेसाठी अंगणवाडी सेविकांची उपस्थिती सक्तीची करणे हे चुकीचे’!

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी २५०-३०० रुपये दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भुमरेंनी त्यांना मिळालेल्या ५० खोक्यातून सभेसाठी पैसे वाटप केले आहेत, असा आरोप खैरे यांनी केला आहे.

खैरे म्हणाले, की एकनाथ शिंदे हे तात्पुरते मुख्यमंत्री आहेत. मागील वेळी ते पैठणला आले तेव्हा केवळ २५ खुर्च्या भरल्या होत्या. त्यामुळे त्यांची बदनामी झाली. म्हणून, आता शिंदे यांना खूश करण्यासाठी बंडखोर आमदार आणि मंत्री भुमरे यांनी मोठ्या सभेची घोषणा केली. त्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अंबड, धनसावंगी, पाथर्डी, संभाजीनगर बाहेरील तालुक्यांतून फोन आले. खोके मोकळे करून ते गर्दी जमवित आहेत, असा आरोपही खैरे यांनी केला आहे.
दुसरीकडे, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही पैसे देऊन गर्दी जमविण्याच्या प्रकारावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैठण दौर्‍यावर आहेत. त्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आदेश काढले गेलेत. या प्रकारावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा चांगलेच संतापले. ‘आम्हीही सत्तेत होतो, पण असे आदेश यापूर्वी कधीच काढले नाहीत. तुमच्या स्वागताला गर्दी जमावी म्हणून असे आदेश काढले गेले असतील, तर ते राज्याचं दुर्दैव आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. पैसे देऊन लोक बोलावणे, गर्दी करण्यासाठी विशेष आदेश काढणे, अशा अनेक चर्चा या सभेआधी होत होत्या.

‘अंगणवाडीच्या महिला आणि इतर महिलांना सभेसाठी २५० रुपये, ३०० रुपये देऊन गाडीत बसवण्यात आले. याबाबत एक ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरत आहे. त्यात पैसे देऊन लोकं आणायला लागले हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय. मला अनेक लोकांचे फोन आले आणि जे दाखवत आहेत ते काय आहे अशी विचारणा झाली. मी त्यांना सांगितलं की जे ५० खोके मिळाले ते पैसे कमी करण्यासाठी आतापासूनच वाटप सुरू झाली आहे.’
– चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!