सोलापुरातील धाडीत इन्कम टॅक्सच्या हाती लागले १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे घबाड
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूर शहर व जिल्ह्यात प्राप्तिकर खात्याने (इन्कम टॅक्स) २५ व २६ ऑगस्टरोजी छापे टाकत, सर्वसामान्य नागरिकांना लुटून कोट्यवधी रुपयांची माया जमवणार्या प्रसिद्ध डॉक्टर आणि काही उद्योजकांवर कारवाई केली होती. या धडाकेबाज कारवाईत जवळपास १०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचे घबाड आयटी विभागाच्या हाती लागल्याची माहिती हाती आली आहे. जप्त करण्यात आलेली ही रक्कम सोलापुरातील दोन उद्योग समुहाने वाळू उत्खनन, साखर निर्मिती, रस्ते बांधकाम, वैद्यकीय सेवा, मेडिकल कॉलेज यातून अवैध मार्गाने मिळवली आहे.
आयटी विभागाने २५ ऑगस्टरोजी सकाळी ७ वाजेपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात, तसेच नाशिक, व उस्मानाबाद जिल्ह्यात छापे टाकण्यास सुरुवात केली होती. पंढरपूर येथील खासगी साखर कारखान्याचे चालक अभिजीत पाटील यांच्या विविध कारखाने आणि उद्योगावरही आयकर अधिकार्यांनी छापे टाकले होते. तसेच, शहर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर आणि काही उद्योजकांवरही छापे पडले होते. उद्योजक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्सट्रक्शन, तसेच ते संचालक असलेल्या सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईशी संबंधित उस्मानाबाद, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले होते.
या कारवाईदरम्यान, काही कागदपत्रे, कॉप्युटरचा डेटा आणि इतर दस्तावेज ताब्यात घेण्यात आले होते. त्याचा सखोल तपास, हाती सापडलेली रोकड वैगरे यांचे विश्लेषण करण्यात आले असता, एकूण १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे घबाड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हाती लागले आहे. करचुकवेगिरी, बोगस दस्तावेज बनवणे, बोगस खर्च दाखवणे, कर्ज व खर्चाबाबत पुरेशे दस्तावेज न सादर करणे, शिकाऊ डॉक्टरांना स्टायमेंड, खर्च दिल्याचे दाखवणे परंतु, प्रत्यक्षात न देणे, तसेच इतरही क्ऌपत्या संबंधितांनी वापरलेल्या असल्याचे दिसून आले आहे. वाळू उत्खनन व साखर निर्मिती यामध्येसुद्धा १५ कोटी रुपयांच्या रकमेची हेराफेरी झाली असून, एकूणच सर्व गोळाबेरीज केली असता, दोन महत्वाच्या उद्योग समूहाने एकूण १०० कोटींपेक्षा जास्त रकमेची अपसंपदा जमवली आहे. ते घबाड प्राप्तिकर खात्याने जप्त केले आहे. मेडिकल कॉलेज व वैद्यकीय सेवेशी संबंधित उद्योगाकडून ३५ कोटी रुपये व इतर मालमत्ता ५ कोटी अशी अपसंपदादेखील प्राप्तिकर खात्याने जप्त केली आहे. याबाबतचे अधिकृत निवेदन लवकरच जारी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागच्याच महिन्यात महाराष्ट्रातच 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी केली होती. यावेली 48 वाहनं आणि 50 अधिकारी होते. यामध्ये पंढरपूरमधील उद्योजक अभिजीत पाटील यांच्याशी निगडित असलेल्या तीन साखर कारखान्यांवर देखील आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी टाकल्या होत्या. सोलापुरात सात ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रावर व्यक्ती रडारवर होते. कृषी पाहणी शिबीरासाठी आलो असल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या होत्या.