Breaking newsHead linesMaharashtra

शेतकर्‍यांना सोमवारपासून मिळणार अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – मागील दीड-दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्य सरकारने साडेतीन हजार कोटी रुपये मदत जाहीर केली असून, ही मदत सोमवारपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. मदतीचे बदलेले निकष आणि नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता, ही मदत मिळणार आहे.

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील २५ लाख ९३ हजार शेतकर्‍यांसाठी ३ हजार ५०१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २३ लाख ८१ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय, एका शेतकर्‍यास ३ हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.

अतिवृष्टीचा फटका, विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सर्वाधिक बसला होता. शिवाय, या विभागात सोयाबीनचा अधिकचा पेरा आहे. त्यामुळे नुकसानीची दाहकता अधिक होती. असे असतानाही मदतीमधून उस्मानाबाद जिल्हा वगळण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १ हजार ५९६ कोटींची तरतूद केली गेली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना अवघ्या काही दिवसांमध्ये मदतीची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!