नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी: छाननी नंतर १० ग्रामपंचायती बिनविरोध.
नंदुरबार(ब्रेकिंग महाराष्ट्र):- जिल्ह्यात १४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊन उमेदवारी अर्ज यांची छाननी झाली असून शहादा तालुक्यातील ६ ग्रामपंचायती तर नंदुरबार तालुक्यातील ४ ग्रामपंचायती साठी एक एक अर्ज आल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची असल्याने रात्री उशिरा पर्यंत छाननी सुरू होती. नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायती सरपंच पदासाठी ३१५ तर सदस्यांसाठी १४४७ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी मध्ये सरपंच पदाचे १२ तर सदस्य पदाचे २५ अर्ज बाद ठरले आहेत. तर शहादा तालुक्यात सरपंच पदाचे ४ तर सदस्य पदाचे २५ अर्ज बाद ठरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.
नंदुरबार तालुक्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमधे देवपूर, वरुळ, सुतारे, भवानी पाडा तर शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर, मोहिदा तर्फे हवेली, सावखेडया, मानमोड्या, काक्रदे, कलसाडी या ग्रामपंचायतीचा समावेश आहे . विशेष म्हणजे या दहा ग्रामपंचायतींसाठी सदस्य आणि सरपंच पदासाठी एकच उमेदवारी अर्ज असल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत.