बुलढाण्यात राडा : ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांशी भिडले!
– शिंदे गटाच्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल, बुलढाण्यातील राजकारण पेटले
– प्रा. नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवत यांच्यासह सेना नेत्यांना धक्काबुक्की
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्या सत्कार समारंभात घुसून शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने जोरदार धुडगूस घालत, कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांच्या उपस्थितीत हा धुडगूस सुरु होता. अखेर शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील चवताळून अंगावर गेल्याने पोलिसांनी मध्यस्थी केली व शिंदे गटाच्या चौघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की केली. तसेच, खुर्च्यांची तोडफोड केली. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी हल्ला करणार्यांत आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे.
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, वसंतराव भोजने, उपजिल्हा प्रमुख संजय हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता सुरु होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमात धुसले व त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या कार्यकर्त्यांनी कपिल खेडेकर, संजय हाडे, लखन गाडेकर, छगन मेहेत्रे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करत, खुर्च्यांची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोलिस हजर होते, परंतु त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांना फोन लावला व त्यांना हा प्रकार कळवला. त्यामुळे पोलिस अधीक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्वतः एसपी आल्याचे पाहून मग पोलिसांनी गोंधळ घालणार्यांना आवरण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यात खुर्च्यांची फेकाफेक करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाल्यामुळे हल्ला करणार्या शिंदेगटातील कार्यकर्ते पळून गेले. शिवसेना नेत्यांनी या घटनेबद्दल आणि पोलिसांच्या समक्ष असा धुडगूस घातला गेल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, दोषींवर कारवाईची मागणी केली. त्यावर दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले. त्यानंतर बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी शिंदे गटाच्या श्याम पवार, गजानन कोरके, गजानन गायकवाड, राजू धोरण या चौघांना अटक करून त्यांच्यावर भादविंच्या ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हल्लेखोरांना पोलिसांनी पाठीशी घातले – प्रा. खेडेकर
शिवसेनेचा कार्यक्रम सुरु असताना शिंदे गटाचे कार्यकर्ते कार्यक्रमात घुसले व त्यांनी कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांना बुलढाणा पोलिसांनीच अभय दिले होते. त्यामुळेच पोलिसांसमोर आमच्यावर हल्ला झाला. बुलढाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी हल्ला करणार्यांना पाठीशी घातले आहे, हल्ला करणार्यांजवळ हत्यारेही होती, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केला आहे.
——
आता जिल्हाभर तीव्र आंदोलन – जालिंधर बुधवत यांनी ठणकावले
अशा पद्धतीने आमच्यावर हल्ले केले तर आम्हीही शांत बसणार नाही. हे बुलढाणा आहे, बिहार नाही. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई केली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. पोलिस प्रशासन खरेच कारवाई करते की नाही, ते आम्ही पाहात आहोत. नाही तर जिल्हाभर शिवसैनिकांचा उद्रेक होईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी दिला आहे. आमच्यावर हल्ला होऊनही आम्ही संयम बाळगला, अन्यथा अनर्थ झाला असता. मी शिवसैनिकाना, संयम बाळगण्याचे आवाहन केले, शांत ठेवले. अन्यथा हल्लेखोर केवळ दहाबारा आणि कार्यक्रमाला तीनएकशे सैनिक हजर होते, अशा सूचक शब्दात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी आपली भूमिका मांडली.
आमचे कार्यकर्ते आग्यामोहोळ, जिल्ह्यात फिरू देणार नाही – आ. संजय गायकवाड
शेतकर्यांची संस्था असलेल्या बाजार समितीत एकतर राजकीय कार्यक्रम घेतला, आणि त्यात आमच्या नेत्यांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. आजची घटना म्हणजे त्याची संतप्त प्रतिक्रिया होय. आमचे कार्यकर्ते आग्यामोहोळ आहेत. यापुढे आमच्या नेत्यांबद्धल गलिच्छ विधाने केल्यास जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला. अनेक दिवसांपासून शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर, छगन मेहेत्रेसह अन्य पदाधिकारी आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खास्ादार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत आहेत. त्यांना समजून सांगितल्यावरही बदल झाला नाही. आजच्या ‘ लाईव्ह’ कार्यक्रमातही हेच घडले. यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. यापुढे अशी भाषा वापरणे बंद केले नाही तर काय होईल ते पाहून घ्या, असेही गायकवाडांनी बजावले.
————-