औरंगाबाद : आता पन्नास खोके घेऊन मजा करणाऱ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये पळताभूई थोडी होईल, जनता या बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणे नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केले तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी बंडखोर आमदारांना दिला आहे. तर न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याकडून लागू द्यावा, यासाठी आपण देवाला साकड घालत असल्याचे खैरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबादेतील विभागीय कार्यालयात शुक्रवारी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.
शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फुटलेले आमदार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत काहीही बोलत आहेत. नेत्यांना उलट बोलला तर सहन केले जाणार नाही. आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहात तर शांत बसा, त्यांची तळी उचला आम्हाला काही म्हणणे नाही. मात्र, अशा पद्धतीने वक्तव्य केले तर परिणाम भोगावे लागतील. तुम्ही शिक्षण सम्राट आहात म्हणून काय झाले. तुम्हालाही एक दिवस ईडी मागे लागेल. अशा कृत्यांमुळे शिवसैनिकांना राग येणारच, ते सोडणार नाही तुम्हाला, असा इशारा खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिला.
उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची पूर्ण माहिती रोज घेत असून, त्याबाबत कायदे तज्ञांशी रोज चर्चा देखील केली जाते. कपिल सिब्बल आणि इतर वकील उद्धव ठाकरे यांची चांगली बाजू मांडत आहे. त्यामुळे आपण देवाकडे प्रार्थना करत आहे. दक्षिणमुखी मारुती आणि जगदंबे जवळ आपण प्रार्थना करून साकडे घालत आहे. खरी शिवसेना कोणती आहे हे लवकरच समोर येईल. आदित्य ठाकरे यांच्या सभांना आता मोठी गर्दी होत आहे. देश विदेशातून उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, शिवसेनाच जिंकेल, असे मत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. यावेळी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, उपाध्यक्ष छब्बुराव ताके, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, ज्ञानेश्वर तांबे पाटील, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी, डॉ. गणेश वाघ, सतिश पाटील, अनिल कुलथे आदींची उपस्थिती होती.