शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा घुमणार? उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे की, राज ठाकरे??
– मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्या घ्यावा: समर्थकांचे आवाहन
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – ‘एक मैदान, एक नेता आणि एक पक्ष’ असे ज्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत गौरवाने म्हटले जात होते. ज्या दसरा मेळाव्यातून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे केवळ शिवसैनिकच नाही तर महाराष्ट्राला विचार द्यायचे, त्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अपशकुन करण्याचा राजकीय प्रयत्न सुरु झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याचे जाहीर करताच, शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानेही याच मैदानावर मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज सादर केला आहे. त्यातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही दसरा मेळावा घ्यावा, असे आवाहन त्यांच्या समर्थकांकडून केले जात आहे. त्यामुळे या राजकीय पेचात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे काय होणार? उद्धव ठाकरे हे त्याच मैदानात दसरा मेळावा घेणार की नाही, यावरून राजकीय प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवसेनेच्या दोन गटात झुंज लावून महाराष्ट्रात आपले कुटील राजकारण कोण पुढे नेत आहे? याची जाणीव आता मराठी माणसाला झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून जो राजकीय गोंधळ सुरु आहे, त्याच्या मागचा कर्ता धनी कोण आहे? हेही महाराष्ट्राच्या आता लक्षात आले आहे. त्यातच, आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा करणार्या शिंदे गटाने अखेर मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला आहे. या मुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी या पूर्वीच अर्ज दाखल करणार्या आणि आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल अशी ठाम भूमिका घेणार्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शिंदे गटात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज शिंदे गटाच्यावतीने आज दाखल करून वादाला तोंड फोडले आहे.
शिवसेना आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे महाराष्ट्रातील अतुट नाते आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य सभेचे आयोजन करत शक्तीप्रदर्शन केले जाते. तसेच, शिवसैनिक व महाराष्ट्राला विचार दिला जातो. पण यावर्षी राजकीय वातावरण खराब झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. शिवसेनेचा बंडखोर गटदेखील दसरा मेळाव्याबद्दल विविध दावे करताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल याबाबत विधान केले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घ्यावा, असे विधान रामदास कदम यांनी केले. त्यानंतर आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक ट्विट करत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याचे आवाहन केले आहे.
आमचीच शिवसेना खरी असा दावा करणारा शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दावा करेल, याची कुणकुण असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची घोषणा करून टाकली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत शिंदे गटाकडून कोणतेही अधिकृत पाऊल उचलण्यात आलेले नव्हते. आज मात्र शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल करत मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. सद्या मुंबई महानगरपालिकेत प्रशासकामार्फत कारभार पाहिला जात आहे. हे पाहता महानगरपालिकेचा कारभार हा शिंदे सरकारकडूनच चालवला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल केला असला, तरी महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर शिवसेनेने तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. शिंदे गटाचा अर्ज आल्यानंतर आता महापालिका नेमका काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.