Breaking newsBuldanaKhamgaonVidharbha

BREAKING NEWS! आ. आकाश फुंडकर यांच्यासह 30 ते 32 जणांवर गुन्हे दाखल

– बैलपोळा सणाला झालेल्या दगडफेकीनंतर खामगाव बंद, बाईक रॅली काढल्याचे प्रकरण

खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र) – बैलपोळा सणाच्या दिवशी दोन गटांत झालेल्या दंगलसदृश दगडफेकप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून, खामगाव बंदचे आवाहन करणारे आणि कार्यकर्त्यांची बाईक रॅली काढणारे राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांच्यासह त्यांच्या 30 ते 32 कार्यकर्त्यांवर खामगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदारावरच गुन्हे दाखल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

शहरातील बोरिपूरा परिसरात दोन गटात बैलपोळा सणाच्या दिवळी दगडफेक झाली होती. या घटनेनंतर आमदार फुंडकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच, तीन पोलिस अधिकार्‍यांमुळे शहरातील वातावरण खराब झाल्याचा आरोप करत, त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याची मागणी केली होती. तसेच, पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आमदार फुंडकर यांनी खामगाव शहरात बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी प्रतिसाद देत, कडकडीत बंद पाळला होता. याच दरम्यान आ. फुंडकर यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली होती. ही रॅली पोलीस स्टेशन समोर थांबवून पोलिसांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह 30 ते 32 कार्यकर्त्यांवर खामगाव शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.


खामगावचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर यांच्याविरोधात खामगाव पोलिसांनी जमावबंदी व लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणी, फुंडकर यांच्यासह ३० ते ३२ जणांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या १८८, १३५ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. तत्पूर्वी, पोलिसांनी हिंदुत्ववादी दोन गणेश मंडळांचे डीजे शहर पोलिस ठाण्यात जमा केले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी यापूर्वीच कायदा हातात घेतल्यास पोलिस कायद्यानुसार काम करतील, असा इशारा दिला होता. त्या इशार्‍यानुसार आ. फुंडकर हे सत्ताधारी भाजप पक्षाचे आणि त्यातही गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतानाही पोलिसांनी आ. फुंडकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पोलिस अधीक्षक, आ. फुंडकर आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक बैठक गुरुवारी झाली होती. या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली नव्हती, त्यामुळे आ. फुंडकर हे पोलिस प्रशासनावर नाराज होते. तसेच, आ. फुंडकर यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांनी पोलिसांच्या शांतता समितीच्या बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. त्यातच आज गुन्हा दाखल झाल्याने ते याप्रश्नी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून, खामगाव शहरातील परिस्थितीबाबत त्यांना अवगत करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!