सोलापूर शहरासह जिल्ह्यात इन्कम टॅक्सच्या धाडी!
– दोन डॉक्टर, एक बांधकाम व्यावसायिकासह उद्योजक अभिजित पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील ४ कारखान्यांवर छापे
हेमंत चौधरी
सोलापूर – सोलापूर शहर आणि जिल्ह्यात प्राप्तिकर विभाग (इन्कम टॅक्स खाते) यांनी एकाचवेळी छापे टाकल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील दोन प्रसिद्ध डॉक्टर व त्यांचे रुग्णालये, एक बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक अभिजित पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील चार कारखान्यांवर छापे घालण्यात आले आहेत. पाटील हे पंढरपूर येथील असून, ते साखरसम्राट म्हणून गेल्या दहा वर्षांपासून ओळखले जात आहे. तब्बल ४० गाड्यांमधून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी सोलापुरात आले आहे. या धाडीत मोठे घबाड हाती लागल्याची माहिती हाती येत असून, अधिकृत माहिती कारवाई पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या कार्यालयावर धाड पडली असून, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गुरुनाथ परळे आणि डॉ. अनुप शाह यांच्या रुग्णालयांवरदेखील छापे घालण्यात आले आहे. या तिघांच्याही कार्यालये, हॉस्पिटल्स यांची तपासणी सुरु आहे. सिव्हिल हॉस्पिटलजवळील एका मुंबईस्थित डॉक्टरच्या रुग्णालयावरदेखील छापा टाकला जाणार असल्याची माहितीही हाती आली आहे. आयकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहुल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी अधिकारी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील अश्विनी हॉस्पिटल आणि कुंभारी परिसरात असलेल्या अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणीदेखील आयकर विभागाचे पथक दाखल झाले हाेते.
याशिवाय, उद्योजक अभिजित पाटील यांच्या पंढरपूरसह राज्यातील चार कारखान्यांवरही एकाचवेळी छापे टाकण्यात आले आहेत. सकाळपासून या कारखान्यांची झडती सुरु होती. या कारखान्यांत पंढरपूर येथील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना, चोरखडी (उस्मानाबाद) येथील धाराशीव साखर कारखाना, लोहा (नांदेड) येथील धाराशीव साखर कारखाना युनीट- आणि चांदवड (नाशिक) येथील वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. पाटील हे पंढरपुरातील मोठे उद्योजक असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. या नेत्याला टार्गेट करण्यासाठी पाटील यांच्यामागे छापेसत्र लागल्याचे बोलले जात होते. गेल्या १० वर्षात अभिजित पाटील हे उद्योजक क्षेत्रात एकदम नावारुपाला आले असून, त्यांनी काही वर्षात चार साखर कारखाने विकत घेतले आहेत.
पंढरपूर तालुक्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांनी नुकताच मोठा विजय संपादन केला होता. त्यामुळे अगोदरचे चार आणि हा पाचवा साखर कारखाना त्यांच्या ताब्यात आला होता. त्यामुळे आजच्या कारवाईने राजकीय क्षेत्रातदेखील मोठी खळबळ उडालेली आहे. आज महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबीराचे पोस्टर लावण्यात आले होते. जवळपास 24 पथकांद्वारे विविध ठिकाणी कारवाया सुरु आहेत. यामध्ये 50 गाड्या आणि शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
सोलापूरमध्ये ‘या’ ठिकाणी आयकर विभागातर्फे तपासणी
1. मेहुल कन्स्ट्रक्शन
2. अश्विनी हॉस्पिटल, सोलापूर
3. अश्विनी हॉस्पिटल, कुंभारी
4. बिपीन पटेल यांच्या घरी
5. डॉ. गुरुनाथ परळे यांचे स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटल
6. डॉ. अनुपम शाह यांचे हार्ट क्लिनिक
7. डॉ. विजयकुमार रघोजी यांचे रघोजी किडनी आणि मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल