– एक युवक जखमी, चिखली येथे उपचार सुरु
– तांदुळवाडी येथील पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
चिखली (तालुका प्रतिनिधी) – साखरखेर्डा येथून दुधा येथील ओलांडेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी जाणार्या शिवभक्तांच्या दुचाकी वाहनाला अपघात होऊन तांदुळवाडी येथील अंकुश रामेश्वर पांचाळ (वय २२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर सोनू घनश्याम बुंधे (वय २१) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने चिखली येथे हलविण्यात आले होते. दुचाकी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अंकुश हा घरातील कमाविता मुलगा होता. त्याच्या दुर्देवी निधनाने तांदुळवाडी येथील पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साखरखेर्डा-लव्हाळा रोडवरील मोहखेडा येथे ही दुर्देवी घटना घडली.
अंकुश पांचाळ व सोनू बुंधे हे साखरखेर्डा येथून लव्हाळामार्गे दुधा येथे ओलांडेश्वराकडे जात होते. मोहखेड येथे त्यांची दुचाकी घसरली व अंकुश पांचाळ याचा जागीच मृत्यू झाला. मोहखेड येथील ग्रामस्थ व साखरखेर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महिंद्र पाटील यांच्यासह राजू निकम यांनी त्यांना तातडीने मदत करत, १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलावून घेतली. या दोघांनाही चिखली येथील जंजाळ हॉस्पिटल येथे हलविले. डोक्याला व चेहर्याला जबर मार लागल्याने अंकुश पांचाळ याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सोनू बुंधे याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्याला किरकोळ मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अंकुश हा घरातील कमाविता मुलगा होता, त्याच्या मृत्यूने पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंकुश पांचाळ हा साखरखेर्डा येथील एससीएन केबल नेटवर्क येथे ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाबद्दल साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत होती.