-सिंदखेडराजा पंचायत समितीत ‘सेवा संकल्प अभियान’चा प्रारंभ; महिनाभर विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाची सिंदखेडराजा पंचायत समितीच्या माध्यमातून तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायती व विभागांमध्ये उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देतानाच स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि पोषणाबाबत जनजागृती करण्यावर अभियानात विशेष भर देण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी अजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या विविध विभागांनी अभियानाचे नियोजन केले असून, पहिल्याच दिवशी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. गावपातळीवर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ताडशिवणीमध्ये वृक्षारोपणासह स्वच्छता अभियान
पंचायत विभागाच्या माध्यमातून ताडशिवणी येथे सेवा संकल्प अभियानाची सुरुवात वृक्षारोपण, विविध प्रमाणपत्रांचे वाटप आणि स्वच्छता उपक्रमाने करण्यात आली. यावेळी विस्तार अधिकारी भास्कर घुगे, राजेश्वर पवार, अभियंता अनिल सपकाळ, रत्नपारखे, ग्रामपंचायत अधिकारी रामदास मेहेत्रे, सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अभियानाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव आणि निरोगी गाव’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी ग्रामस्थांनीही स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वसंतनगरमध्ये प्रमाणपत्रांचे वाटप
वसंतनगर ग्रामपंचायतीमध्येही सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी आर. एन. मेहेत्रे यांच्या उपस्थितीत नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासकीय सेवा व दाखले मिळविण्यासाठी नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून तपासणी व उपचार
सेवा संकल्प अभियानात आरोग्य विभागाचाही सक्रिय सहभाग राहणार आहे. अभियानाच्या प्रारंभी आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. महिलांची आरोग्य तपासणी तसेच महिला व बालकांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे, याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली.
अंगणवाड्यांमध्ये पोषणाबाबत जनजागृती
महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये पोषण व संतुलित आहाराबाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आल्या. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य व सकस आहाराचे महत्त्व, कुपोषण टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि मातांनी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज याबाबत माहिती देण्यात आली. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोषणविषयक संदेश पोहोचविण्यात येत असून, बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
महिनाभर विविध उपक्रमांचे नियोजन
‘सेवा संकल्प अभियान’ केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध विभागांच्या माध्यमातून सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचे नियोजन पंचायत समितीने केले आहे. ग्रामपंचायती, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच पंचायत समितीच्या इतर विभागांच्या समन्वयातून नागरिकांना सेवा देण्यावर भर राहणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे तसेच सीडीपीओ जीवन राठोड यांनी अभियानाच्या नियोजन व अंमलबजावणीत विशेष मेहनत घेतली आहे. प्रशासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनाच्या योजना व सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतात, याचे उदाहरण या अभियानातून पाहायला मिळत आहे.
“नागरिकांनी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा”
“सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्यासोबतच स्वच्छता, आरोग्य, पोषण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. पुढील आठवड्यात पंचायत समिती व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आणखी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी केले.