Breaking newsHead linesMaharashtra

राज्यातील चार हजार शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

– जिल्हा परिषदांचे सीईओ राहणार बदल्यांसाठी प्राधिकृत अधिकारी

पुणे (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सोमवारी राज्यातील ३ हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीचे आदेश काढले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात हे आदेश जारी करण्यात आले. या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आल्या असून, यामध्ये कुठल्याही मानवी हस्तक्षेप नाही, असे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. आंतरजिल्हा बदल्यांसाठी एकूण ११ हजार ८७१ अर्ज आले होते. त्यापैकी ३ हजार ९४३ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३४ जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना मंत्री गिरीष महाजन म्हणाले, राज्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने बदल्या करण्यात आल्या आहेत. अभ्यास गटाचे संशोधन आणि विश्लेषण तसेच शासन निर्णयाची अचूकता, पारदर्शकता आणि सर्व संवर्गासाठी लावलेल्या योग्य निकषानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली असून, या बदल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शंभर टक्के स्वयंचलित पद्धतीने करण्यात आल्या आहेत. आलेल्या एकूण अर्जापैकी ३३ टक्के बदल्या करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.


आंतरजिल्हा बदलीसाठी एका जिल्ह्यात १० वर्षे, त्यापैकी एका शाळेत किमान ५ वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षाघात व अन्य दुर्धर आजाराने ग्रस्त, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी यांचा विशेष संवर्ग भाग-१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच पती-पत्नी एकत्रिकरणाकरिता विशेष संवर्ग भाग-२ मध्ये समावेश केला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ह्या संगणकीय प्रणालीद्वारे विन्सीस आयटी सर्व्हीस (आय) प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!