गोंदिया (जिल्हा प्रतिनिधी) – येथील एमएस आयुर्वेदिक महाविद्यालय कुडवा येथे गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया, जिल्हा वकील संघ गोंदिया तसेच एमएस आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज एमएस आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये रॅगिंगविरोधी कायदे या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम झाला. यावेळी रॅगिंगविरोधी कायद्यांबाबत विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाच्या अॅण्टी रॅगिंग कमिटीचे सदस्य कैलास श्रीदत्तात्रय चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव एस. व्ही. पिंपळे हे होते. या कार्यक्रमास मार्गदर्शिका म्हणून एडवोकेट कु.शबाना अन्सारी ह्या लाभल्या होत्या. कु. अन्सारी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी, अध्यापक वर्ग व कर्मचारी यांना रॅगिंगविरोधी कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच, भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये रॅगिंगविरोधी असणारे सर्व कायदे याबद्दल विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एस.व्ही. पिंपळे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न व उत्तर अशा प्रकारचा संवाद साधला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच महाविद्यालयीन अॅण्टी रॅगिंग कमिटीच्या चेअरमन डॉ. शिर्वेâ, कोऑर्डिनेटर डॉ. रुशाली थोटे, कमिटी सदस्य डॉ. प्रियंका वाटे, प्रियंका बारटक्के, अध्यापक वर्ग तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.