– मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात पुणे येथे केला प्रवेश
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला चांगलेच खिंडार पडले आहे. शहरातील राष्ट्रवादी युवकच्या अनेक पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पडलेल्या या खिंडाराने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही ऑलवेल नाही. नेत्यांच्या पातळीवरदेखील बेबनाव जाणवतो आहे. तसेच, नेतृत्वावरून अहमिका आहे. त्यामुळे कार्यकर्तेदेखील सैरभैर झालेले आहेत. त्याचाच फायदा मंत्री तानाजी सावंत यांनी उचलत, अनेक सक्रीय कार्यकर्ते व युवानेते आपल्या गटात ओढण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात प्रामुख्याने शहरातील युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी सागर शितोळे, शिवराज विभुते व अन्य ३० पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. याबाबत त्यांच्याशी संबंध साधला असता, त्यांनी शहरातील पदाधिकारी युवकांवर काही लक्ष देत नाहीत, व कोणाचे काही ऐकून घेत नाहीत, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री शिंदे गटात आज मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करीत असल्याचे सांगितले होते. मंत्री तानाजी सावंत यांनी या सर्व युवकांना शिंदे गटात प्रवेश देऊन, लवकर त्यांच्यावर चांगली जबाबदारी सोपविण्याचा शब्द दिला आहे. नजीकच्या काळात राष्ट्रवादीचे अनेक नेते, व कार्यकर्ते शिंदे गटात जाणार असल्याचे संकेतही प्राप्त झाले आहेत.