-दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या तिघांवर काळाचा घाला; मोटारसायकलचा चक्काचूर; रस्त्याचे संथ काम, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि ऊस वाहतुकीची गर्दी अपघातांना निमंत्रण!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : दिवाळीच्या खरेदीसाठी मोटारसायकलवरून शेवगावकडे निघालेल्या खानापूर येथील तीन युवकांचा मालवाहू ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. शेवगाव-पैठण रस्त्यावरील घोटणनजीक शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे खानापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमर रवींद्र जगधने (वय १७), ओंकार भाऊसाहेब जगधने (वय १९) आणि रोहित रमेश धनुरे (वय १७, सर्व रा. खानापूर) हे तिघे मोटारसायकल क्रमांक एमएच १६ डीवाय ३८९९ वरून दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी शेवगावकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या एमएच १५ एचएच ३४६५ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकशी त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. ग्रामस्थांनी तिघांनाही तातडीने शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रस्त्याचे संथ काम अपघातांना निमंत्रण!
शेवगाव-पैठण रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, ते अत्यंत संथ गतीने होत आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण असतानाही वाहनचालकांना सावध करणारे दिशादर्शक तसेच धोक्याचे सूचना फलक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याच्या स्थितीचा अंदाज येत नाही. त्यातच सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असल्याने गंगामाई, केदारेश्वर, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर आदी कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊसगाड्या, ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांची या मार्गावर मोठी वर्दळ आहे. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम आणि अवजड वाहनांची गर्दी यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, धोकादायक ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स आणि प्रकाशव्यवस्था करावी, तसेच ऊस वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तीन युवकांच्या मृत्यूमुळे संबंधित यंत्रणेच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अपघातातील ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला असून, शेवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.