– शिवण नदीला पूर, पाणी स्मशानभूमीत शिरले
नंदूरबार (आफताब खान) –
इतकेच मला जाताना कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!
या कवीवर्य सुरेश भटांच्या ओळी आठवाव्यात अशी दुर्देवी घटना नंदूरबार तालुक्यातील वाघशेपा या गावात घडली आहे. येथील ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या स्मशानभूमीत पाणी शिरून दोन मृतदेह वाहून गेल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. शिवण नदीत पाण्याचे विसर्जन होत असल्याने व मुसळधार पावसाने पूर आलेला आहे. पुराचे पाणी स्मशानभूमीत शिरून ही दुर्देवी घटना घडली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणार्या विरचक धरणात पाणीसाठा वाढल्याने पाणी शिवण नदीपात्रात विसर्ग करण्यात येते आहे. यामुळे नदीला पूर आलेला आहे. वाघशेपा गावाची स्मशानभूमी ही या नदीच्या किनार्यावर आहे. या गावात १४ ऑगस्टरोजी पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह हे बाहेर आले असून, यातील दोन ते तीन मृतदेह वाहून गेल्याचा दावा ग्रामस्थांकडून केला जात आहे. याबाबत प्रशासनानेदेखील पडताळणीसाठी आपले पथक घटनास्थळी पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे.