– सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी झोपले?
– शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास हिरवला!
कर्जत (आशीष बोरा) – नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चुकीमुळे अडवला जावून हे पाणी शेतकर्यांच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे शेतीपिके पाण्याखाली गेली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उद््ध्वस्त झाले असून, त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. कोट्यवधीची कामे करणार्या यंत्रणेला व शासकीय अधिकार्यांना लाखोंचे नुकसान होणार्या शेतकर्यांंचे दुःख दिसत नाही व याबाबीसाठी लोकप्रतिनिधीदेखील लक्ष घालत नाहीत, ही शोकांतिका असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय कसा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर दुसरे काय करु शकतो, त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय देण्याची गरज आहे.
श्रीगोंदा-जामखेड रस्त्यावर माळवाडीजवळ रस्त्याच्या कडेला दादा भागूजी बिटके, बापू रामभाऊ बिटके, लाला रामभाऊ बिटके यांचे बागायती क्षेत्र आहे. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या शेतात उतारा वरून येणारे पाणी रस्त्यावर असलेल्या जुन्या दगडी पुला खालून वाहून जात असे. मात्र श्रीगोंदा – जामखेड रस्त्याच्या कामात सदर पुलावरच व आजूबाजूला मुरमाचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे डोंगरावरून येणारे सर्व पाणी अडवले गेले व बिटकेच्या शेतातच शिरले, या तिन्ही शेतकर्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात दोन महिन्यापूर्वी लावलेले उडीद, तूर, मका, पाण्यात गेल्याने जळून गेले असून, पंधरा दिवसात उडीद काढायचे होते त्याचे नुकसान झाले. सदर बागायती क्षेत्रात बी बियाणे पेरले, खत घातले, फवारणी केल्या, खुरपणी केली या सर्वाचे या पाण्याने नुकसान झाले आहे. डोंगर पायथ्याशी असून ही यापूर्वी कधीही असा प्रश्न उपस्थित होत नव्हता. मात्र रस्त्याचे काम करणार्या कंपनीने योग्य ती काळजी न घेतल्याने व पुलाच्या जागेवर पाण्याला वाट न करून दिल्याने हे नुकसान झाले असून, सदर शेतातील पाण्यास वाट करून द्यावी, व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकर्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
श्रीगोंदा – जामखेड रोडचे जे काम सुरू आहे, या रस्त्यावर जुना दगडीपूल होता, तोच बुजवला गेला, त्याचे महत्व लक्षात न घेता व कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला मात्र होणार्या नुकसानीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही व ठेकेदाराचे लोकंही प्रतिसाद देत नाहीत, अशी कैफियत या शेतकर्यांनी मांडली आहे. यावेळी बिटकेवाडी/माळेवाडी सरपंच सोपान बिटके, मधुकर घालमे, गोविंंद तांदळे, लक्ष्मण घालमे, अशोक काळे, बाळासाहेब गुलमोहर, संदीप तांदळे, नाना भिसे, माणिकराव खराडे, विजय भिसे अनिल खराडे, प्रवीण घालमे, जालिंदर खराडे, आदी ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त करत या शेतकर्यांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे. तर दादा भागूजी बिटके, लाला रामभाऊ बिटके, बापू रामभाऊ बिटके यांनी निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जत तालुक्यातून सध्या श्रीगोंदा-जामखेड रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोट्यवधीचे टेंडर घेतलेल्या व वरपासून खालीपर्यत सेटिंग असलेल्या या कंपनीला आपल्या कामामुळे लोकांना कोणत्या अडीअडचणी येत आहेत, याच्याशी काहीही देणे घेणेच नाही व त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले शासकीय अधिकार्यांनाही आपल्या कामाचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पडला असून, या अधिकार्यांना आपल्या कर्तव्याची जाण करून देण्यासाठी निवडून दिलेले लोक प्रतिनिधी तरी या अडचणीत सापडलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहतील, अशी आशा आहे. कर्जत तालुक्याला सध्या सत्ताधारी व विरोधक असे दोन्ही आमदार आहेत. याशिवाय खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य अशी लोकप्रतिनिधीची मोठी फौज असताना या शेतकर्याला कोण न्याय मिळवून देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.