Breaking newsHead linesMaharashtra

सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?

– शिंदे-फडणवीस सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – एका बहाद्दर शिंदे गटाच्या आमदाराने सरकारच्या कर्मचार्‍यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागला. तुम्ही स्वत: ला काय समजताय? सत्ता आली म्हणजे मस्ती आली काय तुम्हाला? अशा शब्दांत राज्याचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिंदे गटातील हिंगोलीचे आमदार संजय बांगर यांना फटकारले.

महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधार्‍यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, कपिल पाटील, एमआयएमचे आमदार यांना बैठकीला बोलावले होते. त्या बैठकीत चर्चा करुन चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचे कारण दिले आहे. स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना विरोधी पक्षाकडून शुभेच्छा देतो. विरोधी पक्षांच्यावतीने ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतो, असे अजित पवार म्हणाले. विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जम्मू काश्मीरमध्ये आयटीपीबीपीच्या जवानांच्या बसचा अपघात त्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन करतो, असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शिंदे गटाच्या आमदारांवर अजित पवार चांगलेच भडकले. शिवसेनेच्या एका आमदाराने शिसैनिकांना मारहाण करण्याचे आदेश दिले होते, असा दावा पवारांनी केला. तसेच शिवसेनेचे आमदार संतोष बागर यांनी एका सरकारी कर्मचार्‍याला कानशिलात लगावल्याची घटना ताजी आहे. या घटनांवर अजित पवारांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेतील काही आमदारांची आणि हिंसक वर्तवणुकीचे समर्थन करतात का? असा सवाल अजित पवारांनी केली. तसेच सत्ता आली म्हणजे मस्ती आली आहे का? कायदा हातात घेतला जातोय. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पटतंय काय? असे सवालही त्यांनी केले.

हे शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत तारखा सुरु आहेत. निवडणूक आयोगात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्टात याचा निवाडा झाला नाही, असं अजित पवार म्हणाले. अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. आम्ही त्यांना १७ ते २७ तारखेदरम्यान अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पुढील वेळी विचार करु असंही अजित पवार म्हणाले.


‘कुठे शाहू फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र, कुठे आपले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला. ज्यांनी नेहमी काम करत असताना कशा पद्धतीने आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीने झाले पाहिजे, हे सगळ्यांना शिकवलं. त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या या महाराष्ट्रामध्ये तोडा, फोडा मारा ही पद्धत? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपला पटतं का?’ असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!