आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महारक्तदान शिबिराचे शिरूर मतदारसंघात चाळीस ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यातील आळंदीत आयोजित रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी उत्साहात रक्तदान केले.
भारताच्या स्वातंत्र्यास बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे माजी विरोधीपक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील यांनी सांगितले. या महारक्तदान शिबिरात डॉ.खा.कोल्हे यांनी जुन्नर मधील निमगाव सावा येथे रक्तदान करून इतराना प्रेरणा दिली. या शिबिरात युवक तरुणांनी प्रतिसाद दिला. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच ( तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवीत हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये ) देण्यात आले. याशिवाय रक्तदात्यास आजीवन मोफत रक्त ही दिले जाणार असून रक्तदात्यांचे नातेवाईकांना वर्षभर मोफत रक्त पुरवठा देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
आळंदी येथील रक्तदान शिबीरास माजी विरोधीपक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील , आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, कविता भालचिम, महिला शहराध्यक्षा रुपाली पानसरे, राणी रणदिवे, डॉ. लक्ष्मीकांत राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष सचिन घुंडरे, जिल्हा सरचिटणीस शशिकांतभाऊ घुंडरे, धनंजय घुंडरे आळंदी पंचक्रोशीतील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने शिबिराचे यशस्वीतेस परिश्रम घेण्यात आले.