Breaking newsHead linesMaharashtraPoliticsUncategorized

थोरात गेले, विखे आले; महसूलमंत्रीपद नगर जिल्ह्याकडेच!

– खाते वाटपावर शिंदे गटातील मंत्री नाराज, एकाचा फोन ‘स्वीचऑफ’!

राज सोमवंशी

शिर्डी/ मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये अगदी अपेक्षेप्रमाणे मंत्रिपदाचे खातेवाटप झाले आहे. महत्वाची व मलईदार खाती भाजपकडे गेली असून, दुय्यमदर्जाची खाती शिंदे गटाला मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गटातील पाच मंत्री नाराज झाले असून, त्यातील एकाचा फोन स्वीचऑफ लागत असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. दुसरीकडे, राज्याचे महसूलमंत्रीपद मात्र नगर जिल्ह्याकडे कायम राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने हे मंत्रिपद नगरला होते. ते आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या रुपाने नगर जिल्ह्याकडेच कायम राहिले आहे. मुख्यमंत्रीपदानंतर हे अत्यंत महत्वाचे असे मंत्रिपद मानले जात आहे. यापूर्वी, शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात महसूल मंत्रीपद भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांकडे होते. त्यामुळे याहीवेळेस ते चंद्रकांतदादांकडेच जाईल, अशी शक्यता होती. परंतु, दादांना डावलून हे पद विखे-पाटलांना मिळाले आहे.

मुंबईतील राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आज झालेल्या मंत्रिपदांच्या खातेवाटपामुळे शिंदे गटातले पाच मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांचा फोन स्वीचऑफ येत आहे. आज झालेल्या खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला जुनीच खाती आली. तर, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेनकडे असणारी काही खातीदेखील भाजपकडे गेली आहेत. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या मंत्र्यांच्या हाती काय लागले, हा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिंदे – फडवणीस मंत्रिमंडळात संधी मिळाली. विखे पाटील हे सहाव्यादा मंत्री झाले आहेत. मंत्रिमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळाल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत, शिर्डीहूनच मुंबई गाठली व मंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले आहे. याशिवाय, त्यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्धविकास सारख्या खात्यांचाही कारभार असणार आहे. महसूल खाते मिळावे यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच हे खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे सोपविले गेले आहे. हे खाते मिळावे यासाठी चंद्रकांतदादा पाटीलही प्रयत्नरत होते. महसूल खाते कोणाला मिळणार यावर राज्यात उलटसुलट चर्चा रंगली होती.

  • दरम्यान चंद्रकांत पाटलांना मात्र उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य यावर आनंद मानावा लागणार आहे. त्यात काँग्रेसमधून काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र महत्त्वाचं असं महसूल मंत्रिपद मिळालं आहे.  चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते आग्रही होते. पण ते खातं त्यांच्याऐवजी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथेही भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी काळात अहमदनगर जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल विभाग होता. विखे-थोरात संघर्ष हा सर्वश्रूत आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधील राज्यातील सद्याचे वजनदार नेते समजले जातात. त्यांना शह देण्यासाठी विखे पाटलांना महसूल खाते दिल्याची चर्चा आहे. मात्र या संघर्षात अहमदनगर जिल्ह्याला पुन्हा एकदा महसूल खाते मिळाले आहे.

महसूल खात्यापाठोपाठ विखे पाटलांकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येईल, असे तर्क केले जात आहे. ते नवीन मंत्रीमंडळातील अहमदनगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री आहेत. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसविरुद्ध भाजपला ताकद देण्यासाठी विखे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण राधाकृष्ण विखे पाटील यांनी करावे, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे उद्या होणारे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदानात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.


  • राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय कारकीर्द
  • सातवेळा आमदार, सातवेळा मंत्री अशी राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी राजकीय कारकीर्द राहिली आहे. सध्या शिंदे सरकारमधील ते सर्वांत वरिष्ठ मंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ते वयाने आणि अनुभवाने सिनिअर आहेत. त्यामुळे विखे पाटील यांच्याकडे महसूलसारखे अगदी तगडे खाते आले आहे. त्यामुळे पुढील काळात मंत्रिमंडळावर विखे पाटील यांचा वरचष्मा असणार आहे हे निश्चित.
  • शिक्षण बीएस्सी अ‍ॅग्रि.
    मार्च १९९५ पासून आमदार
    १९९७ ते १९९९ मंत्री, कृषी व जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय
    १९ फेब्रुवारी २००९ मंत्री, शालेय शिक्षण, विधी-न्याय.
    ७ नोव्हेंबर २००९ मंत्री, परिवहन, बंदरे आणि विधी व न्याय
    ११ नोव्हेंबर २०१० ते २७ सप्टेंबर २०१४ पर्यंत – मंत्री, कृषी व पणन तथा पालकमंत्री, अमरावती
    १० नोव्हेंबर २०१४ विधिमंडळ गटनेते
    २४ डिसेंबर २०१४ ते ४ जून २०१९ – विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती
    १६ जून २०१९ ते २४ ऑक्टो. २०१९ गृहनिर्माणमंत्री
    २४ ऑक्टोबर २०१९ पासून विधानसभा सदस्य, महाराष्ट्र लोकलेखा समितीचे सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!