धुळे (ब्युराे चीफ) – भरधाव वाहनाच्या धडकेत देवदर्शनासाठी पायी जाणाऱ्या दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धुळे शहरालगत असलेल्या अवधान येथे घडली आहे. दोघेही भाविक धुळे शहरातील असल्याने क्षणातच माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेने हळहळ व्यक्त हाेत आहे.
धुळे शहरापासून पंधरा किलोमीटर असलेले पुरातन रोकडोबा हनुमान मंदिर येथे श्रवण मासा निमित्ताने दर शनिवारी शहरातून अनेक नागरिक पायी दर्शनासाठी जात असतात. श्रावण मासातील शनिवार निमित्त शहरातून पायी दर्शनासाठी जात असताना किशोर थोरात व राजू वाघारे हे दोघेही आपल्या मित्रांसमवेत चालत असताना अवधान गावाच्या पुढे एमआयडीसी परिसरात मुंबई आग्रा महामार्गावर मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने दोघांनाही धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने वाहन पळवून नेले. या अपघाताची माहिती शहरात पसरताच थोरात यांच्या परिवारासह मित्रमंडळी नातेवाईक तत्काळ घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी वाहनचालकांविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.