– पहिला मान विखे-पाटलांना, मंत्रिमंडळात एकही महिला नाही
– मंत्रिमंडळ विस्तारात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला लागू
– गृह, अर्थ, महसूलसारखे महत्वाचे खाते भाजपकडे!
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – तब्बल ४० दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे गंगेत न्हाहले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप यांच्यात मंत्रिपदांच्या वाटपात फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्मुला निश्चित झाला असल्याचे स्पष्ट झाले असून, शिंदे व भाजप अशा दोन्ही गटांच्या प्रत्येकी ९ आमदारांनी राजभवन येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी मिळाली नाही. टीईटी परीक्षा घोटाळ्यात मुलींची नावे आल्याने वादग्रस्त ठरलेले आ. अब्दुल सत्तार यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. तर, शपथविधीदरम्यान शपथविधीचा पहिला मान ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना मिळाला आहे.
सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, विजयकुमार गावीत, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे या भाजपच्या आमदारांनी तर गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सावंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई या शिंदे गटातील आमदारांना राज्यपालांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली आहे.भाजपकडून अनेक माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडूनही जुन्या मंत्र्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नाही. त्यामुळे शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही इश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. त्यानंतर विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे संकटमोचक आणि फडणवीस यांचे खास असलेले गिरीश महाजन यांनी शपथ घेतली. सहाव्या क्रमांकावर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. त्यानंतर दादा भुसे यांनी शपथ घेतली.
—
संजय सिरसाठ नाराज, काल मुख्यमंत्र्यांशीही खडाजंगी
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच टीईटी घोटाळ्यात नाव आल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांचा पत्ता कट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज शिंदे सरकारकडील मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तारांचा समावेश झाला आणि संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाला आहे. औरंगाबादमधून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आमदारांचे मन वळवण्यात मोठी जबाबदारी पार पाडणार्या संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिपदी फिक्स धरण्यात आले होते. मात्र आज शिरसाट यांचा शपथविधी न झाल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच संजय शिरसाट व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्यात अपक्षांना तुर्तास स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अपक्ष आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी घटक पक्षांशिवाय सरकार चालू शकणार नाही, असा इशाराच दिला आहे.
—————
राठोडांना मंत्री केल्यावर चित्रा वाघ भडकल्या
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपनेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. पण आता त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करत घरचा आहेर दिला आहे. त्यांनी ट्विट करत राठोडांना मंत्रिपद देणे योग्य नसल्याचे नमूद केले. ‘पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, लढेंगे.जितेंगे’, असं ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
————-
मंगळवारी सकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री लगेच खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठेवण्यात आले तर गृह, अर्थ, महसूल अशी महत्वाची खाती भाजपकडे ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ ही महत्वाची खाती असणार आहेत. तर महसूल खाते भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील सांभाळणार आहेत. ऊर्जा खात्याची जबाबजदारी सुधीर मुनगंटीवारांकडे देण्यात आली. तर सार्वजनिक बांधकाम खाते चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
- असे आहे खाते वाटप –
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
उदय सामंत – उद्योग
दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
सुरेश खाडे – सामाजिक न्याय
दादा भुसे – कृषी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
गिरीश महाजन – जलसंपदा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
अतुल सावे – आरोग्य
तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
संजय राठोड – ग्रामविकास
शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
संदीपान भुमरे – रोजगार हमी
————
१७ ऑगस्टपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. शिंदे सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. अशावेळी राज्यातील अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, शेतकर्यांना आर्थिक मदत अशा अनेक मुद्द्यावरुन विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकार स्थापन झाले तरी महिनाभर विस्तार रेंगाळला. त्यावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. आता पावसाळी अधिवेशनात अजित पवार अधिक आक्रमकपणे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.
————-
१८ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
-शिंदे गट-
दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराजे देसाई, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संजय राठोड
– भाजप-
राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, विजयकुमार गावीत, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण.
——————-
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांना पसंती देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी उमेदवारी दिली होती. या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषद अध्यक्षांना पत्र लिहिले होते. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, सचिन अहिर, अंबादास दानवे, विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्या शिष्टमंडळाने विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद आणि मुख्य सचेतक पदाबाबतचे पत्र दिले होते.